भंडारा : ५७ व्या तिबेटी महिला क्रांती वर्धापन दिवसाच्या निमित्ताने नोरगॅलींग तिबेटीयन सेलटमेंट कॅम्प येथे प्रादेशिक तिबेटी महिला असोसिएशनच्या वतीने शनिवरी तिबेटी महिला क्रांती दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्थानिक संसदेचे सभापती छ्यो गॅल्सन तर, प्रमुख अतिथी म्हणून निर्वासित तिबेटी सरकारचे प्रतिनिधी दोरजी त्सीरींग हे होते. याप्रसंगी सर्वप्रथम केंद्रीय तिबेटी महिला असोसिएशन कडून आलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विविध वक्ते, अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे तिबेटी महिला क्रांती दिनाचे निमित्ताने भाषणे झालीत. त्यात १२ मार्च १९५९ ला तिबेटमधील तिनही प्रांतातील महिला तिबेटची राजधानी लहासामध्ये येथे एकत्रित होऊन त्यांनी चीनने तिबेटला गिळंकृत केल्याच्या निषेधार्थ फार मोठा विरोध प्रदर्शित केला. परंतु चिनच्या पिपल्स आर्मीने या सर्व बहुसंख्येने एकत्रित आलेल्या महिलांवर मोठ्या क्रुरतापूर्वक अत्याचार केला. यात अनेक महिला शहीद झाल्यात. त्यात विशेषत: पामो कुत्संग, नेसिंग डोलकर, सेतेन डोलकर इत्यादी महिला प्रमुख होत्या.चीनने १९५९ मध्ये तिबेटच्या सर्व भागावर कब्जा केल्यानंतर, तिबेटचा मुळ धर्म व संस्कृती नष्ट केली आहे. आजही तिबेटी महिलांचे गर्भपात करण्यात येते. २००८ मध्ये तिबेटने शांतीपूर्वक केलेल्या आंदोलनात अनेक तिबेटीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. २००८ पासून आजपर्यंत तिबेटमधील १५२ लामा, महिला व युवक युवतींनी चीनच्या अत्याचाराला कंटाळून आत्मदहन केले आहे. तिबेटमध्ये चीनकडून फार मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे हनन करण्यात येत आहे. दलाई लामाचे छायाचित्र ठेवणे आणि तिबेटी मठातून परंपरागत पद्धतीने उपासना आणि पूजा पद्धती करण्यावर चीनकडून बंदी घालण्यात आली आहे. अनेक क्रांतीकारकांना चीनने तुरुंगात डांबले आहे. म्हणूनच चीनकडून तिबेटमध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या अत्याचारातून तिबेटची मुक्ती व्हावी, त्यांना त्यांचा धर्म, संस्कृती, भाषा, लिपी इत्यादींचे स्वातंत्र्य असावे आणि तिबेटला स्वाययत्ता मिळावी, याकरिता केंद्रीय तिबेटी महिला असोसिएशन, भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायांना आवाहन करीत आहे की त्यांनी या विषयी चीनवर दबाव आणून तिबेटमध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या अमानुष अत्याचाराला थांबविण्याकरिता पहल करावी, या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम तिबेटी क्रांती दिवसाची सुरुवात तिबेट आणि भारताच्या राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर स्थानिक तिबेटी महिला मंडळांनी या दिवसाला अनुसरून क्रांतीगीत सादर केले. तसेच तिबेटच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेल्या महिला क्रांतीकारकांना १ मिनीट मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी ६ वाजता कॅन्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर १०८ दिप प्रज्वलीत करून पूजा विधी पार पाडण्यात आली. कार्यक्रमात लार मोठ्या प्रमाणात तिबेटी महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग होता.प्रास्ताविक महिला असोसिएशनच्या उपाध्यक्ष कुनसंग देच्छन यांनी केले आणि आभार महिला असोसिएशनच्या सचिव सोनम डोलमा यांनी मानले. कार्यक्रमाला भारत तिबेट मंत्री संघ भंडाराचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
तिबेटी महिलांतर्फे क्रांती दिन
By admin | Updated: March 14, 2016 00:33 IST