ग्राहक मंचचा निकाल : विमा कंपनीला एक लाखाचा दंडभंडारा : विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबियाला विम्याची रक्कम देण्यासाठी लोम्बार्ड विमा कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे या कुटूंबियांनी ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली. यावर सर्व साक्षी पुरावे तपासून ग्राहक मंचने विमा कंपनीला विम्याचे एक लाख व २० हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे. भंडारा शहरातील तकीया वॉर्डातील निलेश चकोले यांनी त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.३६ / ई. १९०६ चा लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा काढला होता. दरम्यान निलेशचा ६ जुनला अपघाती मृत्यू झाला. यामुळे मृतकाची पत्नी निलम हिने मृत्यू दावा मिळण्यासाठी लोम्बार्ड विमा कंपनीकडे कागदपत्रे सादर केली. मात्र विमा कंपनीने मृत्यू दाव्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर निलम चकोले यांनी ग्राहक तक्रार मंचकडे विमा रक्कम मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले. यात न्यायमंचने विमा कंपनी व मृतकाची पत्नी यांचे म्हणणे ऐकून घेतले. यात विमा कंपनीने दोषी असल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी, सदस्य गीता बडवाईक व हेमंतकुमार पटेरिया यांच्या गणपूर्तीने निकाल दिला. यात लोम्बार्ड विमा कंपनीने मृतकाच्या पत्नीला एक लाखांचा विमा दावा द्यावा, ही रक्कम १० टक्के व्याजदराने द्यावी. नुकसान भरपाईपोटी २० हजार रूपये आणि १० हजार रूपये तक्रारीच्या खर्चापोटी द्यावे, या आदेशाची अंमलबजावणी ३० दिवसांच्या आत करण्याचे निर्देशही दिले आहे. न्याय मंचने दिलेल्या आदेशामुळे विमा कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारकर्त्यांकडून अॅड. दुर्योधन बावणे, अॅड. जयेश बोरकर यांनी युक्तीवाद केला. (शहर प्रतिनिधी)
व्याजासह पैसे परत करा
By admin | Updated: December 11, 2014 23:02 IST