तुमसर तालुक्यातील १८ गट ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण सार्वत्रिक निवडणुकीनंतर घोषित झाले आहे. पॅनल व समूहाच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या प्रमुखांचे चेहरे हिरमुसले आहेत. भलत्याच सदस्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ गेली आहे. निवडणूकआधीच आरक्षण घोषित करण्यात आले नसल्याने सारे काही महाभारत घडले आहे. या गट ग्रामपंचायतींना थेट सरपंचपदाची निवडणूक मिळाली नाही. गावातील मतदारांना थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत सहभाग घेता आले नाही. नंतर सदस्यांमधून सरपंचपद निवडीचे आदेश निघाले, असे असले तरी निवडणूकपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले नाही. येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सरपंचपदावर कोण विराजमान होणार आहे, या माहितीपासून गावकऱ्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या दीड वर्षात होणार आहे. या गावांचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले असून, गावात पॅनल व समूहाच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या प्रमुखांना आरक्षित जागेची माहिती असल्याने त्यांची पूर्वतयारी सुरू झाली आहे, अशी संधी गट ग्रामपंचायतींच्या गावांना मिळत नाही.