भंडारा : मागील आठवड्यापासून वातावरणाने कलाटणी घेतली आहे. दोन दिवसापूर्वी लाखनीत गारांसह पावसाने हजेरी लावली तर आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तत्पुर्वी वादळी धुळीमुळे जनजीवन विस्कळीत झाले.दिवसा उन्हाळ्याची प्रखरता जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल जाणवतो. दोन दिवसापासून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुसाट्याचा वारा सुटत आहे. यामुळे मार्गालगत असलेली धुळ व झालेली पानगड वाऱ्याने जोमात वाहत असल्याने पादचारी तथा दुचाकी वाहनधारकांच्या डोळ्यात जावून वाहन चालविताना अडथडा निर्माण होत आहे. धुळीचे कण डोळ्यात गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेकांचा किरकोळ अपघातही घडला आहे.रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्याचे दिवस असताना अचानकपणे पावसाने सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगामातील हातची पीके गेल्यानंतर बळीराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र रब्बी हंगामाचे पीके शेतात उभे असताना पुन्हा एकदा त्यांच्यावर अस्मानी संकटा ओढवले आहे. मागील दोन दिवसापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे दिवसा होणारी अंगाची लाहीलाही काही प्रमाणात शांत झाले असले तरी याचा फटका सहन करावाच लागला आहे. (शहर प्रतिनिधी)