शेततळ्यातून महिला शेतकऱ्यांनी साधली समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:24 AM2021-02-22T04:24:21+5:302021-02-22T04:24:21+5:30

भंडारा : शेतीत शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी पाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.पाण्याची सोय झाली तरच चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, ...

Prosperity achieved by women farmers through farming | शेततळ्यातून महिला शेतकऱ्यांनी साधली समृद्धी

शेततळ्यातून महिला शेतकऱ्यांनी साधली समृद्धी

Next

भंडारा : शेतीत शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी पाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे.पाण्याची सोय झाली तरच चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, हे लक्षात येताच कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेततळे उभारले.आणि आज भाजीपाला लागवडीतून लाखोंचा नफा महिला शेतकऱ्याने मिळवला आहे.

भंडारा तालुक्यातील चिखली येथील मनिषा तानाजी गायधने या महिला शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी ज्या पद्धतीने शेततळ्याचा उपयोग करून घेतला तसा अन्य शेतकऱ्यांनी उपयोग केल्यास गायधने यांनी शेतीत जी प्रगती साधली आहे तशी प्रगती इतर शेतकऱ्यांच्या शेतीतही होऊ शकते याचा वस्तुपाठच गायधने कुटुंबाने समोर ठेवला आहे. भंडारा तालुक्यातील चिखली येथील महिला शेतकरी मनिषा गायधने यांची भाजीपाला लागवडीतून लाखोंचा नफा मिळवणारी यशोगाथा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शेततळे तयार केल्यानंतर गायधने यांनी चार एकर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड केली. यात त्यांनी पाऊण एकर कारली, पाऊण एकर भटई, अडीच एकर मिरची आणि वांगी लागवड केली आहे.पारंपरिकतेला फाटा देण्यासाठी त्यांनी मल्चिंग व ठिबकवर मिरची लागवड केली आहे.यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला आहे. मात्र आतापर्यंत मिरचीच्या सहा तोड्यातून त्यांना पाच लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.या सोबतच लॉकडाउनच्या दोन महिन्यात फक्त भाजीपाल्यातून ७० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मात्र यासाठी फक्त प्रचंड मेहनत उपयोगाची नसून योग्य मार्गदर्शन व तंत्रज्ञान ज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कृषी कृषी सहाय्यक रेणुका दराडे, प बीटीएम सतीश वैरागडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले,उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याने फायदा झाल्याचे सांगितले.

बॉक्स

हरिद्वार, सिक्कीमला घेतले सेंद्रिय शेतीचे धडे

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गायत्री परिवार संस्थानअंतर्गत गृह उद्योग उभारणी आणि सेंद्रिय शेती विषयक प्रशिक्षण मनिषा गायधनी यांनी घेतले. यासोबत पती तानाजी गायधने यांनी सिक्कीम येथे सेंद्रिय शेतीची पाहणी करून प्रशिक्षण घेतले. त्यानुसार स्वतः लागवड केलेल्या भाजीपाला लागवडीतून त्यांनी गावातील दहा महिलांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.यासोबत मिरची पावडर निर्मिती व विक्रीतून त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत.

बॉक्स

कायमस्वरूपी सिंचनासाठी घेतले शेततळे

कोरडवाहू शेतीत पाणी नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळायचे नाही.त्यातच ऐन हंगामात पिकांना पाणी कमी पडायचे.यातून मार्ग काढण्यासाठी सन २०१६-१७ मध्ये परसोडीच्या कृषी सहायक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनात मागेल त्याला शेततळे २५ बाय २० बाय ०३ आकाराचे शेततळे घेतले, आणि आज तेच कृषी विभागाचे शेततळे गायधने कुटुंबीयांना जगण्यासाठी आधार ठरत आहे.

बॉक्स

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेसह वनशेतीचा घेतला लाभ

सन २०२०-२१ अंतर्गत सुरु झालेल्या अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा लाभ घेऊन त्यांनी रोपवाटिका उभारली आहे. यासोबत भाऊसाहेब फुंडकर योजनेतून एक एकर सीताफळ लागवड तर वनशेती अंतर्गत बांधावर एक एकर शेवग्याची लागवड केली आहे. यासोबतच ते सातत्याने उपक्रमशील शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनात आयोजित प्रशिक्षणाला उपस्थिती दर्शवतात.

कोट

शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब व योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनात शेती केल्यास शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते हे महिला शेतकऱ्यांनी साध्य करून दाखवले आहे.जिल्ह्यात भाजीपाला व फळ लागवडीसाठी पोषक वातावरण आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

Web Title: Prosperity achieved by women farmers through farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.