वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

By युवराज गोमास | Published: March 8, 2024 05:02 PM2024-03-08T17:02:57+5:302024-03-08T17:03:06+5:30

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे.

Proposals from older artists stalled for three years; The stage of life is being tested | वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

भंडारा : राज्य शासनाचेवतीने वयोवृद्ध कलाकारांना मासिक २२५० रूपये मानधन दिले जाते. त्यासाठी ५० वर्ष पूर्ण झालेले कलाकार पंचायत समितीमार्फत जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवितात. पालकमंत्र्यांकडून नियुक्त समितीने मंजूर केलेल्या वृद्ध कलाकारांना मासिक अनुदान प्राप्त होते. दरवर्षी १०० कलाकारांची निवड समितीच्यावतीने केली जाते. परंतु, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे शेकडो प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे धूळखात पडून आहेत.

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे. राष्ट्रीय संगीत खडा तमाशा(खडीगंमत), भजन, कीर्तन, दंडार, डहाका, नाटक, गोंधळ, लावणी आदी कार्यक्रम ग्रामीण भागासह शहरातही होत असतात. 

कलेच्या क्षेत्रात जिल्ह्यात अनेक गुणी कलावंत आहेत. त्यांच्या कलेला राजाश्रय प्राप्त व्हावा. ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना सन्मानाचे जीव जगता यावे, या उदात्त हेतूने शासनाने त्यांच्यासाठी वृद्ध कलाकार मानधन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील अनेक कलावंतांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. परंतु, मागील तीन वर्षांपासून अनेक कलावंतांचे प्रस्ताव धूळखात पडून असल्याने कलाकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

२०२० पासून जिल्ह्यात समिती नाही
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कलाकार मानधन समितीचे गठण केले जाते. समितीमध्ये विविध क्षेत्रातील नामवंत असतात. समितीच्या मूल्यांकनानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातात. परंतु, २०२० पासून जिल्ह्यात समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून प्रस्ताव सादर केलेले अनेक कलावंत मानधनापासून वंचीत आहेत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
कलाकाराचे वय ५० पूर्ण झालेले असावे. १५ ते २० वर्ष कला क्षेत्राचा अनुभव असावा. वार्षीक ४० हजारांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, शासनाच्या अन्य मानधन योजनेचा लाभ घेत नसल्याचे शपथपत्र. शासन मान्यताप्राप्त संस्थेचा २० ते २५ वर्ष अनुभवाचे प्रमाणपत्र. आधार कार्ड, रेशनकार्ड, वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांनी घ्यावा पुढाकार
गत तीन वर्षांपासून मानधन समितीचे गठण झालेले नाही. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देत समिती गठण करण्याच्या सूचना द्याव्यात व तीन वर्षांपासून धूळखात असलेले प्रस्ताव मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात २०२० पासून वृद्ध कलाकार मानधन समितीचे गठण झालेले नाही. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार समितीचे गठण होत असते. यापूर्वी दरवर्षी १०० कलाकारांची मानधनासाठी निवड व्हायची. परंतु, समितीची नसल्यामुळे समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पडून आहेत.
- रवींद्र ठवकर, जिल्हाध्यक्ष, सर्वस्तरीय कलाकार परिषद, भंडारा.

Web Title: Proposals from older artists stalled for three years; The stage of life is being tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.