डोअर टू डोअर : विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु, निवडणूक विभागाची नजरभंडारा : विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दि. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून ४८ तासांपूर्वी म्हणजेच उद्या १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत.भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तिन्ही विधानसभा मतदार संघातून एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. यात तुमसर विधानसभा क्षेत्रातून १३, भंडारा विधानसभा क्षेत्रातून १९ तर साकोली विधानसभा क्षेत्रातून २१ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. प्रचारासाठी उमेदवारांकडे फक्त एकच दिवस उरला आहे. आता मतदारांची थेट भेटी घेणे आणि जोडतोडवर उमेदवार भर देत आहेत. मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे. सभा, रॅली, पदयात्रा, सोशल नेटवर्किंग साईटस्च्या माध्यमातून मतदारांना गळ घातली जात आहे. प्रचारावर सर्वच प्रमुख पक्षांच्या आघाड्यांनी भर दिला आहे. प्रचारसभा, पदयात्रांनी वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत तिन्ही विधानसभा क्षेत्रातील एकूण ९ लक्ष १२ हजार २०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तुमसर विधानसभा मतदार संघात एकूण मतदार २ लक्ष ८० हजार २०३ असून यापैकी पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ४२ हजार ६०५ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ३७ हजार ५९८ आहे. भंडारा विधानसभा मतदार संघात एकूण मतदार ३ लक्ष ३७हजार ६६७ असून पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ७१ हजार ३३३ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ६६ हजार ३२२ आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ३३८ असून पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ५१ हजार ४८ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ४३ हजार २८९ इतकी आहे.जिल्ह्यात भंडारा, साकोली, तुमसर या भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. या भंडारा विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६१, तुमसर ६० तर साकोली विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६२ आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्राची संख्या ३५१ असून भंडारा ४२९ तर साकोली विधानसभा क्षेत्रात ३७१ असे एकूण ११ ५१ मतदान केंद्र राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक राज्य राखीव पोलीस दलाची एक आणि सी - ६० पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. प्रचार थांबल्यानंतर प्रचाराच्या काळात उमेदवार व पक्षांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर, पोष्टर, ध्वज, फलके काढून घेणे आवश्यक आहे. साहित्य काढून घेण्याची जबाबदारी परवानगी घेणाऱ्यांवर आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर प्रचार माध्यमांद्वारे उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मतदारांना आवाहन करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ एकच दिवस शिल्लक असून उमेदवार जीवाचे रान करीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)
प्रचारतोफा आज थंडावणार
By admin | Updated: October 12, 2014 23:29 IST