लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील लायब्ररी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, महाल, गांधी चौक, शास्त्री चौक, पोस्ट ऑफिस चौक, सामान्य रुग्णालय, सब्जी मंडी, सागर तलाव, चांदणी चौक, आंबेडकर वॉर्ड, मेंढा, इंदिरा गांधी वॉर्ड आदी भागातील पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याची बाब उघड झाली आहे. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून नाल्या घाणीने तुंबलेल्या आहेत, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गुरुवार १५ मे रोजी भंडारा शहरात दुचाकीने दौरा केला. यादरम्यान ही बाब समोर आली आहे.
भंडारा शहरात काही ठिकाणी पाण्याच्या टाकी शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. दौऱ्यावेळी आंबेडकर वॉर्डातील इलेक्ट्रिक मोटार चोरीला गेल्याची बाब यावेळी वॉर्डातील नागरिकांनी खासदारांना सांगितली. शहरातील इंदिरा गांधी वॉर्डातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था असून टाकीत भंगार हिरवा चिला व अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून आली. नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी नगर परिषद भंडाराचे सीईओ, अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.
संयमाचा अंत पाहू नकाशहरात कधी पाइपलाइनसाठी तर कधी सांडपाण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जाते. या प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असे खडेबोल नगरपालिका अधिकाऱ्यांना खासदारांनी थेट सुनावले.
खड्डे जीवघेणे, पाइप लाइनचे काम अपूर्णभंडारा शहरातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित नाहीत. सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. उग्र दर्पामुळे रोगराईची भीती सतावत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पाइपलाइनचे कामही अपूर्ण असल्याचे दिसून आले.
दोन वर्षांपासून रस्ते तोडणे व जोडण्याचे कामशहरात भूमिगत गटार लाइनचे काम दोन वर्षापासून सुरू आहेत. या कामांसाठी रस्ते तोडणे व जोडण्याची कामे सुरू आहेत. तसेच अन्य कामांसाठीही असाच प्रकार होत आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताचे नुकसान होत असून मोठ्या प्रमाणात पैशाचा अपव्यय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
तर लोकहितासाठी जनआंदोलनाचा इशाराशहरातील रस्ते, नाली व अस्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या दूर न झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दौऱ्यावेळी उपस्थित जिया पटेल, जयश्री बोरकर, धनराज साठवणे, शम्मू शेख, पृथ्वीराज तांडेकर, धनंजय तिरपुडे, अजय मेश्राम, स्मिता मरघडे, जुनेद खान, गोपाल ढोकरीमारे, सचिन फाले, मुकुंद साखरकर, कमल साठवणे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्यशहरवासियांना भेडसावणाऱ्या समस्या दूर कराव्यात. रस्त्यांतील खड्डे, नाल्यांचा उपसा व पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून पूर्ववत शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा नागरिकांना करावा, असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पाहणी वेळी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.