विरली (बु.) : येथील ग्रामायण प्रतिष्ठाणच्या सामाजिक कार्याची दखल घेवून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विरली (बु.) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे यांच्या शेताला भेट देवून सेंद्रीय शेतीचे मर्म जाणून घेतले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची थेट संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.येथील ग्रामायण प्रतिष्ठान ही संस्था २००४ पासून कार्यरत आहे. सेंद्रीय शेती, पारंपारिक बियाणे संवर्धन, मृदा व जलसंवर्धन मधमाशी पालनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून त्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम ही संस्था करीत आहे. यासोबतच रक्तदान, नेत्रदान, देहदान या चळवळी समाजात रूजविण्यासाठी कार्यरत आहे.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रकाश सुखदेवे यांच्या मधमाशीपालन प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी स्वत: मधमाशीपालनपेटी हाताळून मधमाशीपालनविषयी माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान आणि विरली (बु.) ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसचिवालयाच्या सभागृहात ‘‘शाश्वत विकास संवाद’’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी धीरजकुमार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.नलीनी भोयर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, प्रा.बी.एस. रहेले, विरली (बु.) च्या सरपंच अर्चना महावाडे, तहसीलदार विजय पवार, उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाची जोड देवून शेती उद्योगातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळून सेंद्रीय शेतीची कास धरण्याचा सल्ला दिला आणि ग्रामायाणच्या कार्याची प्रशंसा केली. भूमेश्वर महावाडे आणि वामन बेदरे यांनी शेतमालांवर प्रक्रिय करणारे उद्योग उभारण्याची आणि शेतमाल साठवणुकीसाठी गोदामांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अनिल मेंढे यांनी रेशीम उद्योगाला चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.नलीनी भोयर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन बागडे यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच लोकेश भेंडारकर यांनी केले. विरली आगमनप्रसंगी येथील रामकृष्ण मेश्राम यांच्या चमूने घोडानृत्याद्वारे त्यांचे थाटात स्वागत केले.कार्यक्रमासााठी ग्रामायण प्रतिष्ठानचे राजेश महावाडे, गजानन ठाकरे, प्रेमदास खोब्रागडे, मुकेश भेंडारकर, रामदास बेदरे, भाष्कर ब्राम्हणकर, अखिल कोरे, सेवक भेंडारकर, उमेश महावाडे, सुनिल नाकतोडे, संदीप चुटे, ग्रामसुरक्षा दलाचे सुनिल महावाडे, दिलीप शिंगाडे, राहुल भेंडारकर, स्वप्नील पागोटे, शेखर शिंगाडे, संजय बेदरे, अतुल भेंडारकर, कपील हुमने, सुनिल दुनेदार सहकार्य केले. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या
By admin | Updated: November 1, 2015 00:47 IST