साठा जप्त : भंडारा एफडीएची गोंदियात कारवाईभंडारा : औषध विक्री करण्याचा परवाना निलंबीत केलेला असतानाही, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळी येथील एका औषधालयातून औषधांची विक्री सुरू होती. यावरून भंडारा येथील अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून १.२५ लाखांचा औषधसाठा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात सुकळी येथे राजेश कोठीकर यांच्या मालकीचे मे. चक्रधर मेडीकल अॅण्ड जनरल स्टेअर्स आहे. या औषध विक्री दुकानाची ९ एप्रिलला औषध निरीक्षक मनिष गोतमारे यांनी तपासणी केली होती. तपासणीत गंभीर दोष आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त दा. रा. गहाणे यांनी त्यांचा परवाना ११ जुलै ते ९ आॅगस्ट या ३० दिवसांसाठी निलंबित केला होता. औषध विक्रीचा परवाना नसतानाही दुकान मालकाने औषधांची विक्री सुरूच ठेवली होती. या माहितीवरून एफडीएने गुरूवारला सायंकाळी सापळा रचून औषध खरेदीसाठी एक बनावट ग्राहक पाठविला. त्याला दुकानदाराने औषध दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या एफडीएच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत १ लाख २५ हजारांचा औषधसाठा जप्त केला. ही कारवाई सहायक आयुक्त दा. रा. गहाणे, औषध निरीक्षक मनिष गोतमारे, प्रशांत रामटेके यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
औषधांची अवैध विक्री करणाऱ्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 00:24 IST