विक्रमी वाढ : दर कमी करण्याचे केंद्राचे आश्वासन फोलभंडारा : केंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रुपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ आता तब्बल ४५ रूपयांनी वाढून १७५ रुपये प्रति किलो झाली आहे. परिणामी गृहिणींचे बजेट बिघडले असून जेवणातून आता वरण गायब होते, की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.गतवर्षी कमी झालेला पाऊस व तूरीच्या अत्यल्प उत्पादनामुळे चालू वषार्तील तूरडाळीचा साठा आता संपत आला आहे. त्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते. घाऊक बाजारात आता प्रति किलो १७५ रुपये किंमत पोहोचल्याने किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव २०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे गरिबाच्या ताटातील वरण गायब झाले आहे. तूरडाळीपाठोपाठ अन्य डाळीच्या दरातही वाढ झाली आहे. भंडारा येथील घाऊक बाजारात तूरडाळ १७५ रुपये प्रती किलो, चनाडाळ ६३, चिल्टा मूगडाळ १००, मूगमोगर ११५, बरबटी मोगर ८०, चिल्टा उडदडाळ १३५, उडदमोगर १५५, मसूरडाळ ८० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. तूरडाळीची भाववाढ लक्षणीय असून आजपर्यतच्या इतिहासात प्रथमच इतकी भाववाढ झाली आहे. साखरेचे भाव घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी २ हजार १५० रुपये प्रति क्विंटल होते. आता ते २ हजार ७५0 रूपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या भावात दोन महिन्यात ६०० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. २५ रुपए प्रति किलो मिळणारी साखर आता ३० रुपये किलो विकली जात आहे. तसेच शेंगदाण्याचे भाव घाऊक बाजारात ९० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात ते १०० रुपए प्रति किलो आहे. फुटाणा (दालीया) घाऊक बाजारात ८० वर पोहोचला असून किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपये किलो विकला जात आहे. तांदूळाच्या किंमतीत सुमारे २०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. नवरात्रात उपवासाकरिता लागणारे शेंगदाणे, साबुदाणा, भगरच्या किंमतीही वाढल्या आहे. येत्या काही दिवसांत पोहा, मुरमुराच्या किंमतीसुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत. केंद्र व राज्य शासनाने तूरडाळीच्या किंमती कमी करण्याकरिता उचलेली पावले सपशेल अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत चालला आहे. (नगर प्रतिनिधी)
तूर डाळीचे भाव गगनाला
By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST