कोंढा कोसरा : मागील हंगामात पूर्व विदर्भात धानाचे चांगले उत्पादन झाले. तरी भाव १,७०० ते २,२०० रुपये पर्यंत होता. यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानाचे अल्प उत्पादन झाले तरी धानाचे भाव गडगडले. यातच केंद्र शासनाने धानाची निर्यात बंदी केली. यामुळे सध्या तरी धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ म्हणून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर म्हणून हे जिल्हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. शेतकरी वरच्या पाण्यावर तसेच काही प्रमाणात सिंचनाच्या सोयीने धानाचे उत्पादन घेतात. मागील वर्षी चांगले धानाचे उत्पादन असताना १,७०० ते २,२०० रुपये प्रति क्विंटल धान विकले. त्यामुळे सहाजीकच तांदूळ एचएमटी ३,५०० तसेच जय श्रीराम ४,२०० रुपये प्रति क्विंटल तांदूळ अनेकांनी विकले.यावर्षी पूर्व विदर्भात अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी धानाचे उत्पादन घटले आहे. थोडीबहुत सिंचन, तलाव, कालवे याची सुविधा असलेल्या भागात धानाचे उत्पादन झाले. यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आला. बि बियाणे, औषधी, खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच मजुरी खर्च देखील वाढला. अशावेळी धानाच्या शेतीतून हेक्टरी १ लाख रुपयाचे धान अपेक्षित असताना धानाचे भाव गडगडल्याने धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंदी आणल्याने धानाचे भाव पडले. सध्या पवनी तालुक्यात एचएमटी १७०० ते १८०० रुपये तर जय श्रीराम १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल भावाने व्यापारी घेण्यास धजावत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी धान न विकता घरी, गिरणीमध्ये साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला असे दिसते आहे. सध्या धानाचे भाव नसल्याने कोणीही धान भरडाई करण्याची हिंमत करीत नाही, असे एका गिरणीमालकाने सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांची अशी थट्टा यापूर्वी पहावयास मिळाली नाही.ऊस उत्पादकासाठी केंद्र, राज्य सरकार दरवर्षी भाव वाढ करते. तसेच काही कारणाने ऊस कारखान्यापर्यंत पोहचले नाही. तर हेक्टरी २५ ते ३० हजार रुपये मदत जाहीर करते. पण धान उत्पादकाची व्यथा कोणी ऐकून घेण्यास तयार नाही. सध्या तर पूर्व विदर्भातील शेतकरी संकटात आहे. याचा वाली कोणीच नाही, अशी व्यथा शेतकरी सांगतात. (वार्ताहर)
निर्यात बंदीमुळे धानाचे भाव गडगडले; शेतकरी संकटात
By admin | Updated: December 11, 2014 23:02 IST