लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.अर्जुनी मोरगाव येथून कोहमाराच्या दिशेने जाताना ठिकठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांची खोली मोठी आहे. सदर दुहेरी रस्त्याच्या एका बाजूचे अर्धवट काम गतवर्षी झाले. डांबराच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले.या रस्त्याने वाहतूक करताना वाहनाने हेलकावे घेतले नाही तर नवलच. याच रस्त्याच्या दुसºया बाजूला सुद्धा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन कुठून हाकावे, हा मोठा प्रश्न पडतो. खड्ड्यात वाहन आदळून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत.अर्जुनी शहराबाहेरील मोरगाव रोड टी पॉर्इंटपासून तर बरडटोलीपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर लांबच लांब खड्डे आहेत. संबंधित विभागाला हे खड्डे कसे दिसत नाही, हा प्रश्न आहे. खड्डे बुजवून त्यावर हॉट मिक्सिंगचे काम केले जात असतानाही परत काही कालावधीतच पुन्हा खड्डे पडण्याच्या प्रकाराला प्रवाशी कंटाळले आहेत.या मार्गाची रुंदी कमी असून या रस्त्यावर सतत वर्दळ असते. अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. याकडे लोपकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्याच्या जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य महामार्गावर खड्ड्यांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:39 IST
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य महामार्गावर खड्ड्यांचा अडथळा
ठळक मुद्देअपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष