भंडारा : आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसून त्याशिवाय अनेक समस्या प्रलंबीत आहेत. समस्यांची पुर्तता त्वरीत व्हावी, या मागणीसाठी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदसमोर धरणे दिले. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी शिक्षकांना त्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.शिक्षण विभागातील अनियमिततेचा फटका शिक्षकांना बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनबाबत अनियमितता आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली. मात्र समस्या निकाली निघाल्या नाहीत. त्यामुळे शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदसमोर धरणे दिले. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वाघमारे यांनी, उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांना शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या त्वरीत निकाली काढण्याच्या सुचना दिल्या. अन्यथा विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडावी लागव्या लागेल, असे प्रतिपादन केले. यावर शिक्षणाधिकारी घोडेस्वार यांनी, शिक्षकांचे प्रलंबीत वेतन त्वरीत देण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले. निवदेनात, आॅक्टोंबर महिन्याच्या विलंबनास कारणीभुत असलेल्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन द्यावे, तालुकास्तरीय थकबाकीचे निकाली काढण्यात यावे, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अंशदायी योजनेची रक्कम व्याजासह द्यावी, पदनिहाय बिंदू नामावली तयार करावी, आरटीईनुसार पाचवा वर्ग जोडणाऱ्या शाळांना त्वरीत शिक्षक द्यावा, शाळांना ४ टक्के सादील खर्चाची रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलनात मुबारक सैय्यद, संजीव बावनकर, राजेश सुर्यवंशी, धनंजय बिरणवार, विरेंद्र निंबार्ते, राधेश्याम आमकर, तेजराम वाघाये, विनायक मोथरकर, दिलीप बागडे, राजन सव्वालाखे, अनिल गयगये, धनंजय नागदेवे, अरविंद रामटेके, रामरतन मोहुर्ले, राकेश चिचामे, सुधीर वाघमारे, दिलीप बावनकर, प्रकाश महालगावे, रजणी करंजीकर, किशोर डोकरीमारे, ज्योती नागलवाडे, रमेश नागपूरे, विकास गायधने आदींसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघाचे धरणे
By admin | Updated: December 6, 2014 22:42 IST