भंडारा : कोका अभयारण्यातील भेरा लाकूड खरेदी करणे दोघांना चांगलेच महागात पडले असून येथील जिल्हा न्यायालयाने या दोघांना दंड ठोठावला आहे.
प्रवीण मारोतराव घोलपे, रा. इंदिरा गांधी वाॅर्ड आणि तुळशीदास मार्कंड घोलपे, रा. संतकबीर वाॅर्ड, भंडारा अशी दंड झालेल्यांची नावे आहेत. त्यांना ४३३० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत. या दोघांनी माटोरा गावातील सुखदेव मेश्राम व इतर पाच जणांकडून चोरीचे भेरा लाकूड खरेदी केले होते. सुखदेव मेश्राम व त्याच्या सहकाऱ्यांनी हे लाकूड कोका अभयारण्यातून तोडून आणले होते. हा प्रकार घोलपे यांना माहीत असतानाही त्यांनी त्यांच्याकडून या लाकडांची खरेदी केली. याप्रकरणी या दोघांविरुद्ध अवैध वृक्षतोड वन गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. न्यायालयाने प्रवीण घोलपे आणि तुळशीदास घोलपे यांना दंड ठोठावला. या प्रकरणात तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे, वनरक्षक गिरीधारी नागरगोजे यांनी कामगिरी बजावली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांनी दिली.