पाणी वाटप प्रभावित : शेतकऱ्यांची ओरड, पाटबंधारे विभागाचा कारभारचुल्हाड (सिहोरा) : उजवा कालवा अंतर्गत बोरगाव नहराला जोडण्यात आलेली पादचाऱ्यांची बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली आहे. यामुळे शेत शिवारात पाणी वाटप प्रभावित झाले असून तात्काळ पाणी वाटप पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सिहोरा गावात शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी उजवा कालवा अंतर्गत बोरगाव नहर फाटावरून पादचाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. या पादचाऱ्यातील गाळ उपसा करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे धानाचे पिक अडचणीत आले आहे. दरम्यान गेल्यावर्षात या पादचाऱ्यांच्या निर्मितीवर १० लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यात पादचाऱ्यांचे खोलीकरण, पुलाचे बांधकाम तथा सुरक्षा भिंत बांधकामाचे नियोजन होते. खरीप हंगामात पाणी वाटप करताना पादचाऱ्यांची भिंत पुर्णत: कोसळली आहे. या भिंतीचे बांधकाम निकृष्ठ झाले असल्याने कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. भिंत कोसळल्याने पाणी वाटप प्रभावित झाले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती लघु पाटबंधारे विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिली आहे. परंतु १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाची जबाबदारी ३ अमिन यांचे खाद्यांवर असल्याने शेतकऱ्यांची समस्या निकाली काढताना विलंब लागत आहे. उजवा आणि डावा कालव्याचे शाखा अभियंता पद प्रभारी आहेत. यामुळे शाखा अभियंताचे दर्शन दुर्लभ होत आहे. शेतकऱ्यांना गाऱ्हाणे आणि कैफियत मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध नाही, असे चित्र पाटबंधारे विभागात आहे. या पादचाऱ्या बांधकामावरील मंजुर राशीचे संपूर्ण देयकांची उचल करण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदारावर कारवाई होणार नाही. यात शासकीय निधीचे वारे-न्यारे करण्यात आली आहेत.दरम्यान याच पादचारीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. परंतु अतिक्रमणातून पादचारींचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागात सध्या एक ना धड भाराभर चिध्या, असे वास्तव आहे. कुणी जबाबदार अधिकारी नसल्याने नहर आणि कालव्यावर जागोजागी शेतकऱ्यांनी पाईप लावले आहेत. यात पाण्याची पळवा पळवी सुरू झाली आहे. यामुळे टेलवरील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. चुल्हाड गावातील १०० एकर शेती यामुळे प्रभावित झाल्याने दुसऱ्यांदा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धाव घेतली आहे. परंतु साधे निवेदन घेणारे कर्मचारी हजर नव्हते. यामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. या कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येत आहे. पाणीपट्टी करांचे २०-३० लाख रूपये देणाऱ्या या कार्यालयाची अवस्था भंगारात काढणारी झाली आहे. शासनाने रिक्त पदे भरले नसल्याने ही अवस्था झाली आहे. शासनाने रिक्त पदे भरले नसल्याने ही अवस्था झाली आहे. या कार्यालयात शेतकऱ्यांना समाधानाचे उत्तर देणारे कुणी नसल्याने सैरवैर कारभार आहे.या कार्यालयात शाखा अभियंताचे स्थानांतरण झाले आहे. परंतु लाखांदुरातून हा शाखा अभियंता सिहोऱ्यात येण्याचे टाळत आहे. पाणी वाटपात कुणी टेंशन घेण्याचे तयारीत नाही. परंतु जबाबदार अधिकारी अभावी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे ३ अमिन याची मात्र चांगलीच गोची होत आहे. नहराची अवस्था वाईट आहे. केरकचऱ्यांनी तुंबली आहेत. मुरूम ऐवजी माती घालण्यात आली आहे. परंतु देयके मात्र नियोजित कामाचे उचल करण्यात आली आहे. काम आणि समस्या संदर्भात माहिती विचारली असता माहित नाही, हा एकच सुर ऐकायला येत आहे. सुरक्षा भिंत वर्षभरात पहिल्याच पाणी वाटपात कोसळल्याने शेतकऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या असून पाणी वाटप पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पादचाऱ्याची भिंत कोसळली
By admin | Updated: October 19, 2015 00:47 IST