पवनी : स्थानिक डॉ. एल.डी. बलखंडे कॉलेज आॅफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स पवनी येथे प्राचार्य डॉ. जयकिशन संतोषी, तालुका समन्वयक यांचे अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चत करण्यासाठी तालुकास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात तालुक्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ तसेच लोकप्रतिनिधी आ. रामचंद्र अवसरे, पवनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. ठवकर, डॉ. मोटघरे, नगर परिषदेचे सदस्य पुष्पा भुरे, सुरेखा जनबंधू, प्राचार्य नेताजी हटवार, सरपंच शंकर फुंडे, अरविंद धारगावे, व्यापारी, उद्योजक, पालकसंघ, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, समाजसेवक उपस्थित होते.या चर्चासत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधीत प्रश्नावलीच्या आधारे लोकप्रतिनिधी, व्यापारी, समाजसेवक, तज्ञ शिक्षक इत्यादींसोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तालुकास्तरीय चर्चासत्रामध्ये संबंधित सर्व घटकांचा विचार विनिमयाअंती नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत खालील सूचना करण्यात आल्यात.तालुक्यामधील समस्या व नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच तालुक्यामध्ये असलेल्या व्यवसायाशी निगडीत शिक्षणक्षेत्रे विकसीत करण्यात यावीत, मुलींकरीता सुरक्षित वातावरण, होस्टेलच्या सुविधा, महिला शिक्षिकांची पुरेशा प्रमाणात नियुक्ती, परीवहन सुविधा इत्यादी मुलींच्या शिक्षणामध्ये आवश्यक घटक आहे. महाविद्यालयांना आर्थिक स्वायत्ता परंतु त्यावर शासनाचे नियंत्रण तसेच व्यवसायी भिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत.अशाप्रकारे मतप्रदर्शन आ. रामचंद्र अवसरे, बहुतांश शिक्षणतज्ञ व व्यवसायीक, समाजातील मान्यवर यांनी व्यक्त केले. शहरासारख्या शिक्षणाचा सुविधा जर ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचा शहराकडील कल कमी होईल. होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांनाच टक्केवारीनुार महाविद्यालयात प्रवेश दिल्यास सर्वसामान्य न्याय मिळेल. ग्रामीण आणि शहरी भागात भेदाभेद न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष सवलती देण्यात याव्या तसेच परिस्थितीनुसार शासनाकडून अनुदान देणे आवश्यक इत्यादी सुचना करण्यात आल्या.चर्चासत्राचे संचालन प्रा. एन.पी. सिंगाडे यांनी तर आभार प्रा. डॉ. रेखा वानखेडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकरिता पवनीत चर्चासत्र
By admin | Updated: November 1, 2015 00:49 IST