.इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या तीव्र गतीने वाढत आहेत. त्यात उल्लेखनीय म्हणजे लहान मुलांना कोरोना होण्याची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहेत. गत सव्वा वर्षात जिल्ह्यात शून्य ते दहा वयोगटातील ६४९ बालकांना कोरोना झाला आहे तर फक्त मार्च महिन्यात १३२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी ‘‘पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय’’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास भंडारा जिल्ह्यात शून्य ते दहा वयोगटातील ३३९ मुलांना तर ३१० मुलींना काेरोनाची लागण झाली आहे. अकरा ते वीस या वयोगटात १०२२ मुलांना तर ८१४ बालिका कोरोनाबाधित झाल्या आहेत. यात शून्य ते दहा या वयोगटातील ५२ टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली असून दोन बालकांचा मृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. पालकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे.
गत आठवड्यात एका १४ महिन्यांच्या बालकाला तर आता एका पाच दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती गंभीर होण्यापूर्वीच सतर्क होणे महत्त्वाचे असताना वेळीच सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती असतानाही पालकही बेफिकीर वागत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
काय आहेत लक्षणे....
सर्वेक्षणातून सहा वर्षे व त्यावरील बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये खोकला, ताप, धाप लागणे, जोराने श्वास घेणे, डायरिया अशा प्रकारच्या समस्या जाणवू शकतात. लहान मुलांमध्ये ही समस्या जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला व चाचणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतरही याची लक्षणे राहू शकतात. याला लाँग कोविड असेही म्हटले जाते. मोठ्यांमध्ये जशी लक्षणे आढळतात तशीच लक्षणे बालकांमध्येही दिसून येतात. जिल्ह्यात पाच दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर असताना आता पालकांना बाळाची चिंता सतावू लागली आहे.
कोट बॉक्स
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंंग व वेळोवेळी स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीमुळेच आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो. याबाबत अत्यंत जागरूक राहून या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
-डॉ. यशवंत लांजेवार,
बालरोगतज्ज्ञ, भंडारा
कोट बॉक्स
कोरोना संकटकाळात नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे. आपल्यामुळे आपल्या बालकाला कोरोनाची लागण होऊ नये, याची सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. काळजी घ्या, घाबरू नका असेच मी पालकांना सांगू इच्छितो.
-डॉ. अमित कावळे,
बालरोगतज्ज्ञ, भंडारा