मुखरू बागडे लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : धान कापणीच्या वेळी घोंगावणाऱ्या परतीच्या पावसाचे संकट टळल्याने आत शेत-शिवारात कापणीचा हंगाम जाेमात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले, तरी मजूरटंचाईचे संकट मात्र कायम आहे. एकाच वेळी सर्व शेतकरी कापणी करीत असल्याने मजुरीचे दर वाढले असून कापणीसाठी एकरी १६०० ते १७०० रुपये मोजावे लागत आहे.यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. नाही म्हणता म्हणता सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात आता सरासरीपेक्षा काही टक्के पाऊस कमी आहे. मात्र, काही भागात गरजेपुरताच पाऊस झाल्याने हंगाम समाधानकारक आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा माॅन्सून धुमाकूळ घालेल असा कयास होता. परंतु, परतीच्या पावसाचे संकट टळल्याचे दिसत आहे. त्यामुळे धान कापणी जोमात सुरू झाली आहे. ११० ते १३० दिवसांचे धान लाखनी तालुक्यातील चूलबंद खोऱ्यात कापणीला आलेले आहेत. धान कापणीसाठी महिला मजुरांना १५० ते १७० रुपये मजुरी आहे. तर पुरुषांना २५० ते ३०० रुपये मजुरी दिली जात आहे. ठेका पद्धतीत एकरी कापणी, बांधणीचा दर ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत आहे. हलके व मध्यम कालावधीचे धान एकाच वेळी कापणी, बांधणीला आल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. खरीप हंगामात यांत्रिक कापणी, मळणी अपेक्षित पद्धतीने जमत नसल्याने यंत्र उभी आहेत. पंधरा दिवस धानाचा हंगाम वेग घेणार आहे.
धान पिकावर कीडीचा प्रादुर्भाव! - सप्टेंबर महिन्यात नियमित व जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकावर तुडतुडा, मावा, लाल लोंबी, पांढरी लोंबी यांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांनी महागडे कीटकनाशक फवारणी करूनही काही शेतकऱ्यांना शून्य फायदा अनुभवायला मिळालेला आहे. खोडकिडीचा नवीनच प्रकार या वर्षात धान पिकात अनुभवयाला आलेला आहे. गतवर्षी आंध्र प्रदेशात या खोडकिडीच्या रोगाचे चिन्ह दिसली होती. त्याच खोडकिडीचे रुप भंडारा जिल्ह्यातील काही शेतात भात शास्त्रज्ञांना अनुभवायला मिळालेली आहे.