विरोध मुख्यमंत्र्यांच्या सभेला नव्हे तर झाडे तोडण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:17 PM2018-02-02T22:17:33+5:302018-02-02T22:17:55+5:30
मुख्यमंत्र्यांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. या कार्यक्रमाम ते आमच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कारही करणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मुख्यमंत्र्यांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. या कार्यक्रमाम ते आमच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कारही करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला आमचा विरोध नाही मी लावलेली झाडे तोडण्याला आपला विरोध असल्याचे डॉ.पंकज कारेमोरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
नगर पालिकेचा शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची सभा कमी क्षमतेच्या व दाट लोकवस्तीतील संताजी सभागृहाच्या बाजुला प्रांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ७० झाडांची कत्तल केली आणि आता सर्व नियम धाब्यावर बसवून माझ्या मॅटरनिटी हॉस्पीटलसमोर सभा घेऊन ध्वनी प्रदूषनाने नवजात बालकांचा बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप डॉ.कारेमोरे यांनी केला.
तुमसर नगर परिषदेला १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम हा संताजी सभागृहाच्या बाजुच्या प्रांगणावर होत आहे. सदर प्रांगण कमी क्षमतेचा तर आहेच त्याशिवाय तो दाटलोकवस्तीत आहे. रस्ते अरूंद आहेत. तिथे पार्किंगची जागा नाही. तरीही मुख्यमंत्र्यांची सभा त्याठिकाणी घेण्यात येत आहे. तिथे आपण १५ ते २० फूट उंचीचे ७० झाडे स्वखर्चाने लावले आहे.
एकीकडे शासन वृक्षारोपणाकरीता कोट्यवधी खर्च करीत असताना त्या वृक्षांची कत्तल स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आदेशावरून होत आहे. आता ते नवजात बालकाचा बळी घेऊ पाहत आहेत. या परिसरात अनेक रूग्णालये आहेत. दवाखान्यासमोर हॉर्न वाजविण्यावर कायद्याने बंदी आहे. तरीदेखील माझ्या मॅटरनिटी दवाखान्यासमोर दिवसभर मोठमोठ्याने स्पिकर वाजवून ध्वनी प्रदूषनाने नवजात बालकांचे हार्टबिट वाढून त्यांचा जिविताला धोका निर्माण होतो.
झाडे लावून अतिक्रमण करीत असल्याचा आ.चरण वाघमारे यांच्या आरोपाचे खंडन करताना डॉ.कारेमोरे म्हणाले, झाडे लावल्याने अतिक्रमण झाल्याचे आजपर्यंतचा इतिहास नाही मी तिथे बांधकाम केले असेल तर दाखवावे. आ. चरण वाघमारे यांनी झाडांची कत्तल केली नाही तर दुसरीकडे हलविले असे सांगत असतील तर त्यांनी ती झाडे दाखवावी, असे खुले आव्हानही डॉ. पंकज कारेमोरे यांनी आ.वाघमारे यांना दिले आहे.
सदर प्रांगणात जागा बळकाविण्यासाठी प्रांगणाच्या मधोमध कारेमोरे यांनी झाडे लावली. त्यावेळी मी स्वत: जावून झाडे दुसरीकडे लावण्यासाठी सांगितले. परंतु हमरीतुमरी करून त्यांनी प्रागंणाच्या मधोमध झाडे लावली. त्यामुळे ती झाडे काढून सभोवताल लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विरोध केला.
- प्रदीप पडोळे,
नगराध्यक्ष तुमसर.