मनरेगाचा उपक्रम : आमदारांची उपस्थितीभंडारा : एक दिवस मजुरांसोबत ही अतिशय चांगली संकल्पना असून यानिमित्ताने मजुराचं जगणं आपल्याला समजून घेता येईल. शासन, प्रशासन म्हणून त्यांच्यासाठी काय करायचे याचा विचार या अनुषंगाने होईल. मजुरांना सन्मानाची वागणूक देवून त्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक दिवस मजुरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा तालुक्यातील गराडा खुर्द येथे करण्यात आले. यावेळी अॅड. अवसरे बोलत होते. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी राजेश पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपवन संरक्षक विनय ठाकरे, सरपंच रूपाली बडगे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.अप्पर जिल्हाधिकारी राजेश पडोळे म्हणाले, मजुरांमुळेच भंडारा जिल्हा रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्ता निर्माण होत आहे. त्यामध्ये मजुरांचा सिंहाचा वाटा आहे. मजुरांनी गावात होणारे प्रत्येक काम हे स्वत:चे काम म्हणून काम करावे, कारण यातून निर्माण होणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेमुळे गावाचा व पर्यायाने नागरिकांचा विकास होणार आहे.यावेळी गावातील मजुरांना विविध योजनांचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सुशांत बनसोडे यांनी तर आभार गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
एक दिवस मजुरांसोबत
By admin | Updated: May 3, 2015 00:44 IST