लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून एका व्यक्तीला देशी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसासह ताब्यात घेतले. या प्रकरणात सहभागी असलेला दुसरा आरोपी पसार झाला. तुमसर -रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील खापा चौकात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. देशी कट्ट्यासह दोन्ही आरोपी कुठे जात होते, याचा तपास सध्या पोलिस करीत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित सोनवाणे (२९, असे असून तो पौनी रामटेक येथील रहिवासी आहे. मध्यप्रदेशातील पाराशीवणीवरून ते पुढे निघाले होते. एका खबऱ्याने तुमसर पोलिसांना दिलेल्या टीपवरून गुन्हे अन्वेषण विभागाच्या भंडारा आणि तुमसर येथील पोलिसांनी तपासणी केली. एका चारचाकी वाहनातून बुधवारी मध्यरात्री खापा चौकातून ते जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. वाहनाचा क्रमांकही कळविला. मात्र काही वेळानंतर खबऱ्याने, आरोपी दुसऱ्याक क्रमांकाच्या वाहनातून येत असल्याचे कळविले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सयाम यांच्यासह पोलिसांचे पथक चौकात साध्या पोशाखात दाखल झाले. त्यानंतर वाहन तपासणी सुरू केली.
खापा चौकात वाहनांची तपासणी करत असताना एम.एच.४० ए.आर.२१६२ क्रमांकाचे वाहन दूर उभे होते. वाहनाजवळ दोन युवक उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान पोलिस जवळ येत असल्याचे पाहून एक युवक पसार झाला. दुसरा वाहनाजवळच उभा होता. त्याला विचारपूस केली असता, आपण वाहनचालक असून पुढे जायचे आहे, असे सांगितले. परंतु त्याच्या देहबोलीवरून पोलिसांना संशय आला. वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी पिस्टल व दोन बुलेट आढळले. पोलिसांनी आरोपी सुमित सोनवाने याला तात्काळ ताब्यात घेतले. दुसरा खापा चौकाला लागून असलेल्या परसवाडा रस्त्याच्या दिशेने पळून गेला. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३,२५ (१), २७ आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३,२५ (१), २७ आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.