लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) नामांतर सम्राट पृथ्वीराज चव्हाण असे करण्यासंदर्भातील प्रस्तावावर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने या प्रस्तावाविरुद्ध जोरदार आक्षेप नोंदवला असून, अहवालात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाचा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
समितीने दिलेल्या अहवालात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा तुमसरसह भंडारा जिल्ह्यात प्रभाव आढळत नाही, असे नमूद केल्याने राज्यस्तरीय नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागपूर येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहसंचालक के. एम. मोटघरे यांनी तुमसर येथील प्रभारी प्राचार्याना समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.
हे दोन सदस्य तुमसर येथील आयटीआयमध्ये शिल्प निदेशक आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालात, राज्यस्तरीय गॅजेटच्या संकेतस्थळावरून ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासली असता तुमसर तसेच भंडारा जिल्हा यामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आढळत नाही, असे नमूद केले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या अहवालातील नोंदीची चर्चा झाल्यावर स्थानिक शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार भास्कर जाधव, आमदार गजानन लवटे, आमदार नितीन देशमुख यांना थेट संपर्क साधून ही माहिती दिली. तसेच लेखी तक्रार केली.
या वादामुळे स्थानिक पातळीवरही चर्चाना उधाण आले आहे. राजकीय व सामाजिक पातळीवर गाजू लागलेल्या या नामांतर प्रकरणामुळे आगामी काळात तुमसर आयटीआयचे नाव नेमके कोणते ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.