लोकमत न्यूज नेटवर्क मानेगाव (पोहरा) : वसतिगृहातील ओबीसी, व्हीजे, एनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागील चार महिन्यांपासून निर्वाह भत्ता दिलेला नाही. तसेच मागील सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिकावं की शिकू नये, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र वसतिगृह सुरू केले आहे. भंडारा शहरात भाड्याच्या घरात हे वसतिगृह सुरू आहेत. आर्थिक निधीची कमतरता व भौतिक सुविधांच्या अभावामुळे वसतिगृहात मेसची सेवा उपलब्ध नाही. मेस उपलब्ध नसल्याने शासनाकडून वसतिगृहात राहत असलेल्या मुला मुलींसाठी ४८०० निर्वाह भत्ता दिला जातो. ऑगस्ट महिन्यापासून मुले वसतिगृहात राहत आहेत. परंतु, या मुलांना अजूनपर्यंत निर्वाह भत्ता मिळालेला नाही. अडीच लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या गरीब पालकांची मुले या वसतिगृहात राहत आहेत. विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळत नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उपाशी राहून शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न कायम आहे.
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती कधी मिळणार? वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जात नाही, त्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जात नाही. ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने एससी, एसटीच्या मुलांप्रमाणे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरु केली आहे. पण, २०१८-२०१९ पासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
ओबीसी वसतिगृहात ९१ जागा रिक्तशासनाने ओबीसी, व्हीजे, एनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली आहेत. मुलांच्या वसतिगृहात १०० पैकी ५३ मुलांनी प्रवेश घेतला असून, ४७ जागा रिक्त आहेत. मुलींच्या वसतिगृहात १०० पैकी ५६ मुलींनी प्रवेश घेतला असून, ४४ जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींसाठी पैसे, विद्यार्थ्यांसाठी नाही लाडक्या बहिणींना द्यायला सरकारकडे पैसे आहेत; पण शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना द्यायला महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत. लाडक्या बहिणीच्या मुलांसोबत भेदभावपूर्ण वागणूक होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.