शेतकऱ्यांच्या शेतात आता धानपीक डौलाने उभे आहे. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता चांगले पीक येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगले पीक येईल या आशेने शेतात खूप मेहनत घेतली आहे. सध्या रानडुकरे शेतात घुसून धानाच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. धान फुलोऱ्यावर येण्यापर्यंत रानडुकरांचा त्रास वाढणार आहे. यासंदर्भात वन विभागाने रान डुकरांपासून शेतांना सुरक्षित ठेवण्याकरिता योग्य पावले उचलायला हवीत. रानडुक्कर शेतात शिरून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत असली तरी ती पुरेशी मिळत नाही. याबाबतीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यास वन्य क्षेत्रातील प्राण्यांना कुणीही सांभाळून ठेवू शकत नाही. प्राणी केव्हा शेतात घुसतील याचा नेम नाही. त्यामुळे याबाबतीत वन विभाग असो किंवा वन्यजीव विभाग कुणीही दखल घेऊ शकत नाही, अशा उत्तरांनी शेतकऱ्यांत नाराजी आहे. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे वन विभागाने पाठपुरावा करावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी आहे.
शेतशिवारात रानडुकरांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST