भंडारा : भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. आता हे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात आले असून सिंचनापासून वंचित शेतील पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, बावनथडी प्रकल्पाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. धरणातून सिंचनासाठी पाणी देणे सुरू आहे. परंतु, हे पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील केवळ सात हजार शेतजमिनीला मिळत आहे. १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची १४५ प्रकरणे विचाराधीन आहेत. त्यावर निर्णय झालेला नाही. तर ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागपूर येथील सिंचन भवनात बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन एक महिन्या कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील १७ हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या हिवाळी अधिवेशनात ७० तारांकित प्रश्न, २० लक्षवेधी उपस्थित केले. ज्यात यात नागठाणा, सोरना, बघेडा आणि चांदपूर या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनीला बावनथडीच्या लाभक्षेत्रात सामावून घेण्यात यावे, पेंच प्रकल्पाचे पाणी बेटेकर (बोथली) मध्यम प्रकल्पात सोडण्यात यावे, मोहाडी तालुक्यातील फुटाळा तलावाच्या नहरासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, वैगंगा नदीवरील रोहा-मुंढरी या मार्गावर पुलासह बंधारा बांधण्यात यावा, या मागणीला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील उड्डाणपुल आणि बायपास रोड, पाचगाव येथे नवोदय विद्यालय, मोहाडीत तालुका क्रीडा संकुलाची कामे सुरू होणार असून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि नायब तहसीलदारांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कायम विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त पोषण आहार मिळावे, मागीलवर्षीच्या धान खरेदीतील अनियमिततेची चौकशी आणि उंचावर असलेल्या सिंचनापासून वंचित गावांची गावांची सुधारीत आणेवारी करुन वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
आता १७ हजार हेक्टरला मिळणार बावनथडीचे पाणी
By admin | Updated: December 13, 2014 22:33 IST