सालेभाटा : किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.निलागोंदी-किन्ही चार किमी अंतराचा रस्ता आहे. या मार्गाने साकोली-सालेभाटामार्गे निलागोंदी बस सेवा सुरु आहे तर ट्रॅक्स, दुचाकी वाहने व इतरही जडवस्तू वाहून नेणारे चारचाकी वाहने या रस्त्यांनी सतत धावत आहेत. साधा खडीकरणाचा रस्ता असल्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे. सायकलस्वारांना सायकल चालविणे कठीण आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात पाचही वाहने चालत नाही. अशा रस्त्यांवर डांबरीकरण आहे. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर मागील २० वर्षापासून खडीकरणाचे काम होऊ शकले नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. लाखनी ते निलागोंदी मार्गे किन्ही हा वर्दळीचा रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैलबंडीने जाणे अवघड झालेले आहे. पावसाळयामध्ये खोल खड्डयात पाणी साचून राहतात. त्यामुळे वाहन चालविताना चालकाचे निंयत्रण सुटले वा तांत्रिक बिघाड वाहनामध्ये आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुख्य रहदारी असलेल्या निलागोंदी-किन्ही रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था
By admin | Updated: March 16, 2015 00:32 IST