लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बाळाचा तब्बल ७० हजार रुपयांत सौदा करून त्याची अवैधपणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध १४ जुलै रोजी साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या बाळ ताब्यात घेण्यात आले असून शिशु गृहात सुरक्षित आहे.
ही घटना उजेडात आली, जेव्हा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर एका बाळाच्या विक्रीची माहिती मिळाली. या तक्रारीनंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित प्राथमिक चौकशी सुरू केली. चौकशीत बाळाला अवैध पद्धतीने दत्तक दिल्याची बाब स्पष्ट झाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी तपास सुरू केला आहे.
साकोली पोलिसात 'या' सात जणांविरुद्ध गुन्हान्यायालयीन आदेशाशिवाय आपसी संगनमताने बाळ देण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी राजपाल हरीचंद रंगारी, सुचिता हरीचंद रंगारी (रा. हसारा, ता. तुमसर), अजित पतीराम टेंभुर्णे, सोनाली अजित टेंभुर्णे, नंदकिशोर मेश्राम, राकेश पतीराम टेंभुर्णे, पुष्पलता दिलीप रामटेके (रा. धानोड, ता. साकोली) यांच्या विरोधात बालकांची देखभाल व संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८० व ८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णालयात प्रसूती झाल्याचे खोटे कागदपत्रंसाकोली तालुक्यातील एका उपजिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२४ मध्ये जन्मलेल्या बाळाचा १५ दिवसांतच १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करण्यात आला. दत्तक घेणाऱ्या पालकांनी खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्याचे खोटे कागदपत्र तयार केले आणि नगरपरिषदेतून बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे तपासात समोर आले.
जन्म मृत्यू नोंद महत्वपूर्ण दस्ताऐवजजन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेण्यासह कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे असते. दत्तक प्रक्रियेच्या संबंधी कायदेशीर प्रक्रीयेची जाणीव ठेवावी.
यांचे सहकार्य ठरले मोलाचे
- ही संपूर्ण कारवाई सहायक आयुक्त योगेश जवादे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सानिका वडनेरकर यांच्या सहभागाने पार पडली.
- पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, ही घटना जगासमोर आणण्यात चाइल्ड हेल्पलाइनचे समन्वयक विजय रामटेके, विक्की सेलोटे, सुनील राणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
"न्यायालयाच्या आदेशाशिवाय बालकाची दत्तक प्रकिया पूर्ण होत नाही. त्यामुळे निबंधक, जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी यांनी कारवाई करताना तपासणी करणे आवश्यक आहे."- नितीनकुमार साठवणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, भंडारा.