जिल्हा बँक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा अधिक पीक कर्जाचे वितरण करते. गत खरीप हंगामात ३९ शाखांमार्फत ३२० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले हाते. जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक कर्ज वाटण्यात अग्रेसर ठरली. नाबार्ड व शासन यांनी पुरविलेल्या पीक कर्जाच्या निर्देशाच्या पुढे जात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सावकारी पाशातून मोकळे होण्यास मोठी मदत झाली. १० एप्रिलनंतर पीककर्ज वाटपाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील पीक कर्जतात्काळ भरावे असे आवाहन करण्यात आले आहे. ८६ कोटी ३२ लाख रुपयांची वसुली २४ मार्चपर्यंत झालेली होती. नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याजदर व प्रोत्साहनपर योजनेचा लाभ शासन निर्णयानुसार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणानुसार या वर्षापासून तीन लाखांपर्यंत शून्य व्याजदराने पीक कर्जाची तरतूद केलेली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी नियमितता टिकवीत मुदतीच्या आत पीक कर्जाची रक्कम भरीत बँकेच्या व स्वतःच्या भरभराटीस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पालांदूर येथील सेवा सहकारी संस्था पीक कर्ज घेण्यात व वसुली भरण्यात अग्रेसर आहे. गत हंगामात ४७७ शेतकऱ्यांना १ कोटी ७७ लाख ५२ हजार ७०० रुपयांचे पीक कर्ज वाटण्यात आले होते. त्यापैकी २१५ शेतकऱ्यांनी ७५ लाख ३४ हजार भरलेली आहे. धानाचे प्रलंबित असलेले चुकारे मिळाल्याने पुन्हा पीक वसुलीला गती मिळालेली आहे.
जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेतील संस्थाध्यक्षांनी व गट सचिवांनी पीक कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करावे. झालेल्या वसुलीचा ताळेबंद ५ एप्रिलपर्यंत शाखा स्तरावर पोहोचवावा. जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देताना सोयीचे होईल.
सुनील फुंडे
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा