राहुल डोंगरे यांचे प्रतिपादन : तुमसरात माजी सैनिकांचा मेळावातुमसर : राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तीची मने जोडण्याची प्रक्रिया होय. राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात सुख दु:खाच्या समान भावना असायला पाहिजेत. पारतंत्राच्या ज्या तन्मयतेने, एकजुटीने त्या काळाची तरुण पिढी काढली. त्याच तन्मयतेने, जिद्दीने व त्यागाने देशाचे अखंडत्व कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी लढले पाहिजे. आपला धर्म हा आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवून राष्ट्रधर्म हा श्रेष्ठ धर्म आहे असे यातून राष्ट्राच्या ऐक्यासाठी भारतीयांनी झटणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले. दिव्य ज्योती माजी सैनिक बहुउद्देशिय संस्था तुमसर - मोहाडीच्या विद्यमाने महिला महाविद्यालय तुमसर येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर सुभाष सेलोकर, उद्घाटक के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नायब सुभेदार भोला कांबळे, माजी कॅप्टन कुंडलिक आगाशे मंचकावर उपस्थित होते.डोंगरे पुढे बोलताना सांगितले की, विविधतेत एकता असलेले आपले राष्ट्र आहे. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वासाठी आंबेडकरांनी जनतेस शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्या संदेशाला प्रत्यक्ष कृती आणणे काळाची गरज ठरली आहे. शहीद लान्स नायक हनुमंतच्या सारखे वीरपुत्र या भारतमातीला लाभलेले आहेत. याच जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत. भारतीयांनी सम्राट अशोक, छत्रपती शिवायी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचे पुरोगामी विचार अंगिकारले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्णा तितीरमारे यांनी तर संचालन व आभार शंकरलाल रुंधे यांनी केले. यशस्वितेकरिता मनोहर तुरकर, अर्जुन हिंगे, सुरेश सेलोकर, सावित्रीबाई महिला बचत गट, जिजामाता माजी सैनिक, महिला बचत गट व दिव्य ज्योती माजी सैनिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्राच्या ऐक्यासाठी झटणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:27 IST