सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी असलेले सचिव अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे सचिवांची मनमानी सुरु झाली असून ते गावाच्या विकासाकरिता डोकेदुखी ठरले आहेत. सडक-अर्जुनीलासुद्धा नगर पंचायतचा दर्जा प्राप्त झाला असून येथील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासक म्हणून तहसीलदार एन.जे. उईके यांना पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे सडक-अर्जुनी नगर पंचायतची सर्व कामे प्रशासकाच्या देखरेखीखाली होत आहेत. कार्यालयीन कामाकरिता एका आठवड्यातून दोन दिवसांकरिता गोंदियावरुन पाठविण्यात येत आहे. सडक-अर्जुनी येथील ग्रामपंचायत बरखास्त झाल्यामुळे त्या ग्रामपंचायतध्ये असलेले सचिव हटवार हे अतिरिक्त ठरले आहेत. परंतु त्यांचे स्थानांतरण इतर ठिकाणी झाले नाही. त्यामुळे आपले येथून स्थानांतर लवकर व्हावे याकरिता त्यांनी नागरिकांशी असभ्य वर्तन करायला सुरवात केली आहे. मी तुमच्या नगर पंचायतचा कर्मचारी नाही, जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आहे. आमचा विभाग वेगळा आहे. माझी तक्रार करा, माझी बदली करा, अशा प्रकारचे वर्तन सचिव हटवार यांचे वाढलेले असल्यामुळे ते गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.सदर प्रतिनिधीने सचिव हटवार यांच्याशी चर्चा केली असता माझ्याकडील अर्ज मी तहसीलदारांना दिला आहे. मी येथील कोणतेही काम करणार नाही. मला येथून स्थानांकरणाची अपेक्षा आहे. फक्त खुर्चीवर बसून राहणे एवढेच काम माझ्याकडे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अशा सचिवाची बदली नक्षलग्रस्त भागात करावी, अशी चर्चा नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
नगर पंचायतमध्ये सचिव ठरताहेत डोकेदुखी
By admin | Updated: May 16, 2015 01:09 IST