पैसा झाला खोटा, पाच रुपयांची नोट चालेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:41+5:302021-09-22T04:39:41+5:30

इंद्रपाल कटकवार भंडारा : बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गोष्ट अफवा म्हणून लवकर पसरविली जाते. ती गोष्ट खरी आहे ...

The money became fake, the five rupee note did not work | पैसा झाला खोटा, पाच रुपयांची नोट चालेना

पैसा झाला खोटा, पाच रुपयांची नोट चालेना

Next

इंद्रपाल कटकवार

भंडारा : बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गोष्ट अफवा म्हणून लवकर पसरविली जाते. ती गोष्ट खरी आहे किंवा नाही याची चाचपणी केली जात नाही. असेच पाच रुपयांच्या नोटाबाबत झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा केंद्र सरकारने पाच रुपयांच्या नोटा या चलनावर कुठलीही बंदी आणली नसतानाही भंडारा जिल्ह्यात पाच रुपयांची नोट चलनातून बाद किंवा हद्दपार झाली आहे, असे सांगून ती घेतली जात नाही. परिणामी पैसा झाला खोटा, पाच रुपयांची नोट चालेना, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

बॉक्स

कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही

रिझर्व्ह बँकेने कुठल्याही नाण्यांवर बंदी आणलेली नाही. एक, दोन, पाच रुपये, दहा रुपये व त्यानंतर येणाऱ्या नवीन नाण्यांवर कुठलीही बंदी आणण्यात आलेली नाही. बाजारपेठेत मात्र अफवांना चर्चा देत त्यावर बंदी आणली जाते.

बॉक्स

कोणत्या नोटा नाकारतात

बाजारपेठेत कुठल्याही नाण्यांवर किंवा नोटांवर बंदी नाही. मात्र भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठेत ‘पाच रुपयांच्या नोटांवर बंदी आली, त्या चालत नाहीत,’ असे सांगण्यात येऊन त्या घेण्यास नाकारल्या जात आहेत.

बॉक्स

बँकांमध्येही नाण्यांचा साठा

एका पाहणीतून बँकांमध्ये नाण्यांचा साठा असल्याचेही दिसून येत आहे. यात एक, दोन, पाच व दहा रुपयांच्या शिक्क्यांचा समावेश आहे. मात्र यामधील कुठल्याही नाण्यांवर बंदी नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. नागरिकच अफवांचा बाजार गरम करून एखादे नाणे किंवा नोटांबाबत अफवा पसरवीत असतात. त्यामुळेच संबंधित नाणे किंवा नोट बाजारात घेत नाहीत. केंद्र सरकार किंवा आरबीआयने अशी कुठलीही सूचना किंवा जाहीर घोषणा केलेली नाही.

कोट बॉक्स

पाच रुपयांच्या नोटांवर बंदी नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा केंद्र सरकारने कुठल्याही नाण्यांवर किंवा नोटांवर बंदी आल्याचे घोषित केलेले नाही. भंडारा जिल्ह्यात पाच रुपयांची नोट बाजारपेठेत स्वीकारली जात नसल्याचे ऐकिवात आहे. प्रत्यक्षात पाच रुपयांच्या नोटांवर कुठलीही बंदी आणली गेली नाही. बँका पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. नागरिकांनी कोणताही संभ्रम मनात ठेवू नये. पाच रुपयांच्या नोटा चलनात आहेत. याबाबत कुणी अफवा पसरवत असेल तर प्रशासनाला कळवावे.

- अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, अग्रणी बँक, भंडारा.

Web Title: The money became fake, the five rupee note did not work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.