भंडारा : जिल्ह्यातील २७० ग्रामीण डाक सेवकांनी सात दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे पोस्ट कार्यालयातील लाखोंचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. याचा फटका सुकन्या योजनेवर पडला आहे. संपामुळे नवीन खाते उघडणे बंद करण्यात आले आहे. रेल्वेची परीक्षा दिलेल्या शेकडो परिक्षार्थींचे मुलाखत पत्र व दहावी-बारावीच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका डाक कार्यालयात पडून आहेत. यामुळे अनेकांचे जीवन अंधकारमय होणार आहे. टपाल खात्यातील सर्व ग्रामीण भागातील डाक सेवकांनी १० मार्चपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यात नागपूर ग्रामीण विभागातील १,१५० ज्यात भंडारा ग्रामीण विभागातील शाखा डाकपाल १२० व १५० पोस्टमनचा समावेश आहे. सात दिवसापासून संप सुरू असल्याने ग्रामीण डाक विभागाशी जुळलेल्या ग्रामस्थांना याचा जबर फटका बसला आहे. या मागणीकडे ना शासनाचे लक्ष गेले ना लोकप्रतिनिधीचे.डाक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका डाक कार्यालयात पडून आहेत. या वेळेत बोर्डात पोहचण्यास विलंब होत असल्याने त्याचा निकालावर परिणाम पडणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आले होते. या परीक्षांचा निकाल लागलेला असून त्यात उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थींना रेल्वे प्रशासनाने मुलाखतीचे पत्र पाठविले आहे. हे मुलाखत पत्र डाक कार्यालयात पडून आहेत. परिणामी परिक्षार्थींना वेळेत वितरणासाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेकडो परिक्षार्थी रेल्वे भरतीपासून वंचित राहण्याची चिन्हे बळावली आहे. पर्यायाने त्यांचे जीवन अंधकारमय होणार असल्याने पालकांची अस्वस्थता वाढलेली आहे. मात्र, संपामुळे नागरिकांचा जीव पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. उद्या हे तरुण बेरोजगार नोकरीला मुकले तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)प्रमुख मागण्याग्रामीण डाक सेवकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, आठ तासाचे काम द्यावे, डाक सेवकांच्या मृतकांना अनुकंपावर नियुक्त करावे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करावी, खात्यातील कर्मचाऱ्याप्रमाणे पदोन्नती वेतन द्यावे.लाखोंचा व्यवहार ठप्पडाक कार्यालयातून रोजगार हमी योजना मजुरांना मजुरी दिली जाते. त्यासोबतच डाक विभागाचे दैनंदिन व्यवहारात मुदत ठेव, मनिआॅर्डर, विद्युत बील, बचत खाते यांच्यासह नव्याने सुरू झालेल्या सुकन्या योजनेला फटका बसला आहे. यातून डाक विभाग रोज लाखोंचा व्यवहार करतो. मात्र, संपामुळे हे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले आहे.
लाखोंचा आर्थिक व्यवहार ठप्प
By admin | Updated: March 17, 2015 00:42 IST