लोकमत न्यूज नेटवर्कखापा (तुमसर, जि. भंडारा) : तुमसर पंचायत समिती येथील रेकॉर्ड रूमला शनिवारी सकाळी ८ वाजता भंयकर आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषद तुमसर व नगर पंचायत मोहाडी येथून अग्निशामक पथक बोलविण्यात आले. पण आग आटोक्यात आली नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
पंचायत समिती तुमसर येथील रेकॉर्ड रूम मधून सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ रेकॉर्ड रूम खोलून बघितले असता रूम मधील रेकॉर्डला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. या आगीत मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जळून खाक झाला.
शिक्षण विभाग व इतरत्र विभागांच्या फायली आणि रेकॉर्ड पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याची चर्चा आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये शिक्षण घोटाळा मोठ्या प्रमाणात उघड झाला असून त्याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातही उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर या आगीची नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
जुना रेकॉर्ड जळालाया रेकॉर्ड रूममध्ये १९६२ पासूनचा जुना रेकॉर्ड गठ्ठे बांधून ठेवण्यात आला होता. तो सर्व या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. एकही फाईल आगीपासून वाचू शकली नाही. यामुळे आता जुना रेकॉर्ड शोधताना स्थानिक प्रशासनाची मोठी अडचण निर्माण होणार आहे.