नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : महर्षी विद्या मंदिर शाळा इमारत उद्घाटन समारोहभंडारा : बालमनावर चांगले संस्कार झाले पाहिजे. आई, वडिलानंतर शिक्षक हाच संस्कार देणारा गुरू आहे. उत्तम संस्कार सदगुणातून प्राप्त होत असते. लहान सहान बाबींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवून राष्ट्रोपयोगी नागरिक घडविण्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे, असे मौलिक प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महर्षी विद्या मंदिर शाळा फुलमोगरा (भंडारा) येथील इमारतीचे उद्घाटन तथा ग्यान युग दिवस समारोहप्रसंगी ना.गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर महर्षी विद्या मंदिर समुहाचे अध्यक्ष महर्षी गिरीशचंद्र वर्मा, खासदार नाना पटोले, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशिवार, आमदार चरण वाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) के.झेड. शेंडे, पोलीस उपअधीक्षक सुर्यभान इंगळे, प्राचार्य श्रृती ओहळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात गुरूपुजनाने करण्यात आली. संगीत शिक्षक विनोद पत्थे यांच्या रचित स्वागतगिताने विदयार्थीनींनी उपस्थितांचे स्वागत केले.ना. गडकरी म्हणाले, उत्तम शिक्षक, उत्तम विद्यार्थी व उत्तम इमारत या तीन गोष्टी चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी आवश्यक आहेत. परंतु कुठे चांगले शिक्षक असले तर इमारत नसते, उत्तम विद्यार्थी असले तर शिक्षक नसतात तर तिन्ही बाबी असल्या तर चांगले शिक्षण नसते. मात्र महर्षी विद्या मंदिर शाळा याला अपवाद ठरली आहे. महर्षी योगी यांचा वसा या शाळेने मागील २५ वर्षांपासून जोपासला आहे. एखादा माणुस जीवन जगला, यापेक्षा तो जगला कसा हे महत्वाचे आहे. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान शिकताना मूल्याधिष्ठित शिक्षणालाही महत्व दिले पाहिजे. ‘‘वही मनुष्य है जो मनुष्य के लिए मरे’’ या शब्दातून जीवनाची व्याप्ती सांगताना ना.गडकरी यांनी विद्यार्थ्यांना सदगुण अंगिकारून संस्कारमय जीवन जगण्याचे आवाहन केले. महर्षी गिरीषचंद्र वर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणातून सर्वोत्तम जीवन जगण्याला महत्व दिले पाहिजे. आपण काय आहोत, आपण जगाला काय देऊ शकतो याचा विचार करून देशाप्रती आपले कर्तव्य सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. सदगुण जीवनाच्या शेवटपर्यंत टिकले पाहिजे. आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या आचरणातून व कर्मातून बोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी खा.नाना पटोले, आमदार बाळा काशिवार यांचीही यथोचित शाषणे झालीत. महर्षी समुहातर्फे काढण्यात आलेल्या विविध उदबोधनपर पुस्तकांचे ना. गडकरी व अन्य अतिथींच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रास्ताविकातून प्राचार्य श्रृती ओहळे यांनी महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुरेख संचालन विभावरी मिश्रा व ज्योती उके यांनी केले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षक अनिता वाघमारे, संध्या भोवते, जयश्री जोशी, प्रज्ञा संगीतवार यासह अन्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
संस्कारातून राष्ट्रोपयोगी नागरिक घडवा
By admin | Updated: January 25, 2016 00:44 IST