युवराज गोमासे
भंडारा :तुमसर विधानसभेसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. परंतु, प्रारभीच तुमसर शहरातील मतदान केंद्र क्रमांक २०९ व १८६ मधील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाला. मतदान केेंद्र क्रमांक ९ मधील ईव्हीएम मशीन व इतर यंत्र नियमानुसार लावण्यात आलेले नसल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
१८६ मतदान केंद्रावर तासभराच्या उशिराने मतदान झाले. बिघडलेली मशीन बदलविण्यात आली. शारदा विद्यालयातील आदर्श मतदान केंद्राच्या दीडशे मीटर परिसरातील राजकीय पक्षांचे स्लीप वाटप करणारे केंद्र हटविण्यात आल्याने पोलिस कारवाईचा राजकीय पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. दुपारी ३ वाजतापर्यंत ५२.७२ टक्के मतदान झाले.
तुमसर विधानसभा मतदार संघात तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. निवडणूक यंत्रणांच्या चोख बंदोबस्तात निवडणुकीला प्रारंभ झाला. विधानसभेत सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत ६.९० टक्के मतदान झाले. ११ वाजतापर्यंत २०.६८ टक्के, दुपारी १ वाजतापर्यंत ३६.२७ टक्के तर दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून ५२. ७२ टक्क्यांवर पोहचली. दिव्यांग, नवमतदार, जेष्ठ, वृद्ध, तसेच महिला व पुरूषांमध्ये मतदानाचा विशेष उत्साह दिसून आला.