भेजगाव : भेजगावसह परिसरात अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. सदर डॉक्टर रुग्णांची आर्थिक लुट करीत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरातील चिचाळा, गडीसुर्ला, येरगाव तथा अन्य गावांत बोगस डॉक्टरांनी रुग्णालये उघडले आहेत. कुठलीही वैद्यकीय पदवी नसतानाही एखाद्या डॉक्टरकडे काही दिवस अनुभव घेतल्यानंतर ग्रामीण भागात आपले प्रस्थ वाढवून आर्थिक लुट करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. भेजगावसह परिसरातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून येथील गरीब नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उचलून ही मंडळी त्यांची लूट करीत आहेत. भेजगाव येथील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी रुग्ण गेले तर रुग्णांची तपासणी करून आवश्यकता नसतानाही प्रत्येक रुग्णाला दोन इंजेक्शन दिल्या जाते. याबाबत रुग्णांनी डॉक्टरला विचारणा केली तर, आम्ही किरायाने राहत असल्याने आम्हाला परवडेल का, असा प्रतिप्रश्न बोगस डॉक्टर करतात. आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता गरीब व अज्ञान रुग्णांची लुट करावी का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वैद्यकीय पदव्याही स्वत:च्या नावासमोर जोडण्यात आल्या आहेत. पाईल्स, भगंदर, हॉयड्रोसिल आदी रोगांवर खात्रीलायक उपचार करण्याची पत्रके रुग्णांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
भेजगाव परिसरात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची लूट
By admin | Updated: May 17, 2014 23:33 IST