शिक्षकांचा आरोप : सुट्ट्यांच्या दिवसात काढले आदेश, आर्थिक उलाढाल करून तयार केली यादी भंडारा : पती-पत्नी एकत्रिकरणाची प्रक्रिया राबवून सेवाजेष्ठ किंवा गरजूंना आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, असे न करता आर्थिक उलाढालीतून बदली प्रक्रिया यादीत घोळ करून शासकीय सुट्ट्यांच्या दिवसात आदेश काढल्याचा आरोप आता अन्यायग्रस्त शिक्षकांनी केला आहे. २९ सप्टेंबर २०११ च्या शासन अध्यादेशानुसार पती-पत्नी एकत्रिकरणानुसार ६० टक्के तर एकतर्फी बदलीसाठी ४० टक्के नाहरकत प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. मात्र, शासन अध्यादेशाला केराची टोपली दाखवित नियमबाह्यरित्या बदली प्रक्रिया राबविल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यात आणखी ही भर पडली आहे. येथील रोष्टरची प्रक्रिया अद्यावत झालेली नसल्याने याचा फटका अनेक शिक्षकांना बसलेला आहे. बदली करताना वर्तमान स्थितीची यादी प्रसिध्दी करणे गरजेचे असताना यादी प्रसारित न करताच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवून शिक्षकांना नियमबाह्यपणे नियुक्त आदेश देण्यात आलेले आहे. नियमानुसार जिल्ह्याने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास दुसरी जिल्हा परिषद त्यांना कार्यमुक्त करते. व त्यांना पुढचे आदेश दिले जाते. परंतु जिल्हा परिषद भंडाराने तसे न करता अनेक शिक्षकांना गावासहित आदेश दिल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. बदली करताना प्रथम जिल्ह्यातील शिक्षकांची विषय शिक्षक व सहायक शिक्षकांचे समायोजन अपेक्षित आहे. नंतर त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया राबविल्यानंतर गोपनियस्थितीत कार्यालयाने आदेश देवून प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती. मात्र, नियमांना बाजूला सारून प्रक्रिया राबविल्याने यात मोठी आर्थिक उलाढाल करण्यात आल्याचा आरोप आता शिक्षकांकडून होत असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पारदर्शक पध्दतीने बदल्या कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार सुमारे सहा महिन्यापूर्वी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी असाच घोळ केला होता. एकिकडे शिक्षण विभाग रोष्टर नसल्याची कबुली देत असताना दुसरीकडे मात्र, त्यांनीच बदली प्रक्रिया राबविली आहे. सहा महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील १७ शिक्षकांचे असेच नियमबाह्यपणे आदेश काढले होते. सदर प्रकरणी आंतर जिल्हा बदली कृती समिती व शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर ती बदली प्रक्रिया थांबविली होती, हे विशेष. ११७ शिक्षकांची बदली प्रक्रिया आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासकीय सुट्ट्यांच्या दिवसात राबविल्याचा आरोपही आता होत आहे. महिन्याचा दुसरा शनिवार १० डिसेंबर, रविवार ११ डिसेंबर व १२ डिसेंबर ईद-ए-मिलाद या दिवसांच्या दरम्यान ही प्रक्रिया राबविली. यावेळी शिक्षण विभागाने तब्बल ११७ शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र व शाळेसह आदेश दिल्याची गंभीर आरोप शिक्षकांकडून होत आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया यादीत घोळ
By admin | Updated: December 22, 2016 00:50 IST