अमरावती : मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे. प्रमुख पिकांच्या लागवडीसह फवारणी व काढणीपर्यंतचा अर्धा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र यावर्षी पहायला मिळत आहे. मागील दशकापासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. विशेषत: रोखीचे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले. खरिपाच्या सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा ५० टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी लागवडक्षेत्र ७ लाख १४ हजार हेक्टर असताना ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे; तथापि पेरणीनंतर जून महिन्यापासून दीड महिना पावसाची दडी, त्यानंतर पावसात खंड व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. मागील दोन, तीन वर्षांचा सोयाबीन पिकाचा ताळेबंद पाहिला असता उत्पादन खर्चाच्या अर्धेदेखील उत्पन्न झालेले नाही.बँकांचे पीककर्ज, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली होती. पेरणी पाठोपाठ डीएपी खते, तणनाशके, कीटकनाशकांच्या तीन फवारण्या, निंदण, खुरपण, मशागत ते काढणीपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांनी केला. प्रतिएकर खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचा उतारा व प्रतीक्विंटल मिळणाऱ्या भावाचा ताळेबंद पाहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला निम्मे खर्चही पदरात पडला नाही. आणेवारीदेखील ४६ पैसेच आहे. म्हणजेच जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.
उत्पन्न सोडाच; उत्पादन खर्चाचेही वावडे!
By admin | Updated: December 11, 2014 23:00 IST