खैरलांजीत नांदताेय सामाजिक एकाेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 01:07 PM2021-09-26T13:07:37+5:302021-09-26T13:16:57+5:30

समाजमन हेलावून टाकणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाचे नाव घेताच मन सुन्न होतं, अंगावर काटे येतात. मात्र, या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गावकऱ्यांनी आता समृद्धीकडे वाटचाल सुरू केली असून गत पंधरा वर्षांत या गावात विविध विकास याेजना गावात राबविण्यात आल्या आहेत.

khairlanji village recovering from the brutal massacre | खैरलांजीत नांदताेय सामाजिक एकाेपा

खैरलांजीत नांदताेय सामाजिक एकाेपा

Next
ठळक मुद्दे'त्या' घटनेच्या कटु आठवणींनी आजही येतात शहारे 

भंडारा : खैरलांजी नाव उच्चारताच आजही अंगावर शहारे येतात. या गावात भाेतमांगे परिवारातील चाैघांची अमानुष हत्या झाली होती. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा खैरलांजीत साक्षीदार आहे, ताे भाेतमांगे परिवाराचा उघड्यावर असलेला 'लाेखंडी पलंग'. तर आता या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गाव विकासाची कास धरून प्रगतीचे पाऊल टाकत आहे. मात्र, घटनेची धग आजही कायम आहे.

खैरलांजीची समृद्धीकडे वाटचाल

तो कलंक पुसून काढत खैरलांजीकरांनी समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. गत १५ वर्षांत विविध विकास याेजना गावात राबविण्यात आल्या. जलजीवन-जलमिशन अंतर्गत खैरलांजीसाठी ५५ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठा याेजना मंजूर झाली आहे. शाळेच्या वर्गखाेल्याही मंजूर झाल्या आहेत. गावात साैरऊर्जेवर प्रकाश देणारे दिवे लावण्यात आले तर काही खांबांवर एलईडी बल्ब प्रकाशमान आहे. अंगणवाडी पूर्णत: साैरऊर्जेवर प्रकाशमान हाेत आहे. या गावाला २००९ साली तंटामुक्त गाव पुरस्कारही मिळाला हाेता. आता गावाची १०० टक्के हगणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सरपंच माेरेश्वर धुमनखेडे यांच्या मार्गदर्शनात गाव आता विकासाचा मार्ग चाेखाळत आहे.

आठवणींचा काहूर

दीड दशक झाले तरी आजही आठवणींचा काहूर दाटून येताे. संपूर्ण देशच नव्हे तर जागतिक पातळीवर या हत्याकांडाचे पडसाद उमटले हाेते. गावाच्या एका टाेकावर राहणाऱ्या भैय्यालाल भाेतमांगे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या झाली हाेती. ताे काळाकुट्ट दिवस हाेता, २९ सप्टेंबर २००६. भैय्यालाल भाेतमांगे यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका आणि राेशन व सुधीर या दाेन मुलांची हत्या करण्यात आली. अमानुषपणे त्यांचे मृतदेह कालव्यात फेकून दिले. भैय्यालाल शेतावर असल्याने ते या भीषण हल्ल्यात बचावले. संपूर्ण देश या हल्ल्याने हादरून गेला हाेता. विधानसभेपासून संसदेपर्यंत चर्चा झाली. न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर आंदाेलनेही झाली.

या हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरू झाला. १५ ऑक्टाेबर २००८ राेजी भंडारा सत्र न्यायालयाने आठ जणांना दाेषी ठरविले. आता या घटनेला दीड दशक झाले आहे. भाेतमांगे परिवारातील कुणीही खैरलांजीत राहत नाही. रहायला कुणी त्या कुटुंबातील जिवंतही नाही. भैय्यालाल भाेतमांगे यांचाही २० जानेवारी २०१७ राेजी हृदयविकाराने मृत्यू झाला. खैरलांजीत त्यांची काही वर्षापर्यंत झाेपडी हाेती. आता तीही उद्ध्वस्त झाली असून त्याठिकाणी गवत वाढले आहे. या गवतात एकमेव लाेखंडी पलंग २९ सप्टेंबर २००६ च्या रात्री घडलेल्या थरार नाट्याचा साक्षीदार आहे.

दीड दशकापूर्वी घडलेल्या घटनेची धग आजही या गावात जाणवते. बाहेरील कुणी अनाेळखी व्यक्ती गावात आला की, सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. हत्याकांडाचा विषय काढला की, कुणी फारसे बाेलायला तयारही नसतात. मात्र, या कटु आठवणी हृदयात साठवत गावकऱ्यांनी सामाजिक एकाेपा निर्माण केला आहे. विकासाची कास धरत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आता गावात कुठे भांडण तंटा नाही की कुणाबद्दल आकसही नाही. आपण भले आणि आपले काम अशी स्थिती या गावातील नागरिकांची आहे. मात्र, आजही खैरलांजीच्या त्या घटनेचा काहूर प्रत्येकाच्या मनात दाटलेला दिसून येताे.

झाेपडी जमीनदाेस्त, लाेखंडी पलंग देताे साक्ष

खैरलांजी गावाच्या एका टाेकावर भैय्यालाल भाेतमांगे यांचे झाेपडीवजा घर हाेते. या झाेपडीत पाच जणांचे कुटुंब वास्तव्याला हाेते. हत्याकांडानंतर भैय्यालाल भाेतमांगे भंडारा येथे वास्तव्याला आले. या झाेपडीत कुणाचेच वास्तव्य नसल्याने आता ती झाेपडी पूर्णत: जमीनदाेस्त झाली. झाेपडीच्या ठिकाणी आता घरातील एकमेव लाेखंडी पलंग आहे. या पलंगालाही गंज चढला असून अवतीभाेवती गवत आणि झुडपी वनस्पती वाढली आहे. पंधरा वर्षात बदल काय झाला असेल तर या झाेपडीपुढे असलेला कच्चा रस्ता आता सिमेंटचा झाला आणि घटनेच्यावेळी छाेटासा असलेला वृक्ष आज चांगलाच माेठा झाला. 

भाेतमांगे परिवाराचा हत्याकांडाचा आमच्या गावावर माेठा कलंक लागला. या घटनेला जबाबदार असणाऱ्याला न्यायालयाने शिक्षाही दिली. आता कटू आठवणी जपत गावात सर्व जाती, धर्माचे लाेक गुणागाेविंदाने राहत आहेत. गावात विविध विकासकामे हाेत आहेत. हत्याकांडाच्या स्मृती कधीच संपणार नसल्या तरी सामाजिक एकाेपा निर्माण करण्यात मात्र यश आले.

- माेरेश्वर धुमनखेडे

सरपंच, खैरलांजी, ता. माेहाडी

Web Title: khairlanji village recovering from the brutal massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.