राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा : ई. झेड. खोब्रागडे यांचे प्रतिपादनभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्ष साजरे करतांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती अधिक संवेदनशील, सामाजिक आणि उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून प्रशासनात काम केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संतोष बनसोडे, प्रा. वामन गवई, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. खोब्रागडे म्हणाले, शासन, प्रशासनात काम करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो. म्हणून त्यांनी अधिक पारदर्शी, संविधाननिष्ठ आणि वैयक्तिक नितीमत्तेचे भान ठेवून आपले काम करावे. अधिकाऱ्यांच्या जाणिवा सामाजिक असल्या तर कामात लक्षणिय फरक पडतो, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांसाठी खुप काम केले. महिलांना मालमत्तेमध्ये समान अधिकार देण्याचे काम असो की, कामगार कायदे करण्याचे काम असो. त्यांनी संविधानात मुलभुत तत्वे व मुलभुत अधिकार यांच्या माध्यमातुन समाजाला एका स्तरावर आणले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची सर्वांना माहिती व्हावी आणि अधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी जे समानतेचे स्वप्न पाहिले होते ते प्रत्यक्षात आणण्याची जाणीव आपल्यातही निर्माण व्हावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे, असे ते म्हणाले. प्रा. संतोष बनसोडे यांनी बाबासाहेबांचे स्त्रीवादी कार्य यावर प्रकाशझोत टाकला. भारतातील स्त्री ही धार्मिक ग्रंथांची गुलाम होती. त्यामुळे प्रथम तिला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी माहिलांच्या परिषदा घेतल्या. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी पहिल्यांदा सायमन कमिशनसमोर हा विषय मांडला. महिलांना ३६ आठवड्याची प्रसूती रजा याबरोबरच कुटुंबनियोजन आणि स्त्रियांसाठी रुग्णालये, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, यासाठी विधेयके मांडलीत. हिंदु कोड बील मांडले. मात्र हे बील तेव्हाच्या सरकारने मंजूर केले नाही तेव्हा बाबासाहेबांनी राजिनामा दिला, असे बनसोडे यांनी सांगितले. प्रा. वामन गवई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. नरेश आंबिलकर यांनी जादुटोणा विरोधी कायद्यावर आणि श्रीकांत परिंदे यांनी मागदर्शन केले. बाबासाहेबांचे विचार यावर वकृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डी. एन. धारगावे यांनी केले. या कार्यशाळेला सर्व विभागातील राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जनतेप्रती जाणीव ठेवावी
By admin | Updated: March 10, 2016 00:55 IST