भंडारा : आज हे काय घडतंय, उद्या काय घडेल या चिंतेतच कोरोना महामारीने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडविले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. चिंतेचे मूळ कारण माहीत असतानाही अनपेक्षितपणे मानसिक स्तरावर त्यावर पडदा टाकून स्वत: चिंताग्रस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मानसिक ताण वाढल्याने जगायचे कसे हा खरा प्रश्न आजघडीला उपस्थित होत आहे. मानसोपोचार तज्ज्ञांच्या मते औषधांपासून निर्माण होणाऱ्या अँटीबाॅडीजपेक्षा हसा, बोला, मन एकमेकांत मिसळा यातूनच खरी अँटीबाॅडीज तयार होईल, असा सकारात्मक सल्लाही देत आहेत.
कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी, यासाठी शासनाने नियम दिले आहेत. कोरोना व्हायरस काय व शरीरात आपल्या प्रवेश तर करणार नाही ना? कोरोनामुळे माझी नोकरी गेली, माझ्या कुटुंबाचे काय होईल, मी जगणार की नाही अशा नानाविध समस्यांचा कल्लोळ मानवी मनात रान माजवत आहे. याच मानसिक तणावात आजची पिढी गुरफटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने कोविड हेल्पलाइन अंतर्गत समस्या सांगून त्याचे निदान करण्याचे कार्य सुरू केले आहे. मात्र, तिथे काॅलची संख्या मर्यादित असली तरी सर्वाधिक काॅल हे पुरुषांचे असल्याचे दिसून आले आहे. बाहेर वावरताना आपल्याला कोणती काळजी घेण्यासोबतच औषधांची माहितीही विचारली जाते. त्यातही काही जण वैयक्तिक प्रश्नही विचारण्यात असल्याचे सांगण्यात येते. शहरात बोटांवर मोजण्याइतपतच मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडेही कोरोना काळात कौटुंबिक समस्या घेऊन अनेक जण आलेत. मोबाइलवर बोलून मनातील व्यथाही सांगितल्या. त्यात कोरोनामुळे घडलेल्या दुष्परिणामांचा पाढाच वाचल्याचे तज्ज्ञ सांगतात. सध्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी जिवंत राहणे व सकारात्मक दृष्टिकोण ठेवणे याच दोन बाबी स्वाभाविकपणे जपाव्या, असा सूरही व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या जगभर पसरलेल्या साथीमुळे खचून जाऊ नका. मनालाही ब्रेक द्या. अतिविचार शरीरावर परिणाम करतो. निसर्गत: जीवन जगण्याचा प्रयत्नच मनाला आधार देईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
पुरुष सर्वाधिक तणावात
संसाराचा गाडा आजघडीला स्त्री पुरुष दोन्हीही ओढतात; परंतु एखाद्या कुटुंबात पुरुषच कमावता असताना व कोरोनामुळे नोकरीही किंवा आर्थिक स्त्रोत बंद झाल्यास याचा ताण निर्माण होतो. तज्ज्ञांना आलेल्या काॅलवर सर्वाधिक पुरुषच तणावात असल्याचे दिसून आले.
कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?
महिला अश्रूंमधून भावना व्यक्त करतात; परंतु पुरुष रडला की त्याला दुबळा समजल्या जाते. ही सर्वसाधारण समजूत आहे; परंतु पुरुष रडला म्हणून तो कमजोर होत नाही. कधीकधी तणावाचा बांध मनात दडवून चेहऱ्यावर हसू आणणाराही पुरुष असतो. कोरोना संकटकाळात नानाविध समस्या भेडसावत असतानाही पुरुष ही भावना व्यक्त करतो. मात्र, तो कधी सरळ तर कधी अन्य पद्धतीने बाब सांगत असतो. त्यामुळे पुरुषही स्वत:ला ब्रेक देऊन मनात बदल घडवून आणतात तेही आपल्या भावना व्यक्त करतात. जमेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात, चांगला आहार आणि मन मोकळे करून मनातील गुरफट दूर करतात. आजघडीला कोरोनाचे टेंशन सर्वांनाच असले तरी त्यात असाध्य अशी कुठलीही बाब राहिली नाही.
असे आहेत तरुणांचे प्रश्न
सध्या अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे कोरोना परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगारही हिरावले. वाट्टेल ते कार्य करून कुटुंबाचा तर कधीकधी स्वत:चा खर्च भागवत आहेत. येणारी स्थिती कशी असेल या विवंचनेत आजचा तरुण गुरफटला आहे. आजूबाजूला इतके घडत असताना त्याविषयी वाचावेसे वाटणे, अपडेट राहणे आजच्या तरुणांची मानसिकता आहे; परंतु त्यातून काळजी वाढू शकते. आधीच तरुणांसमोर नोकरी, करिअर, पक्के घर यासह अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्यात कोरोना महामारीने स्वप्नांचा अपेक्षाभंग केला असून या तरुणाईला मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज आहे.
मित्रांनो, खचून जाऊ नका
मित्रांनो काळ अनपेक्षित असला तरी खचून जाण्याची काहीही गरज नाही. सकारात्मक विचार शरीरात सर्वात जास्त अँटीबाॅडीज तयार करायला मदत करतात. मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विचार म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती नाही. तरुण असो की अन्य व्यक्ती चिंता किंवा स्ट्रेस करून त्या समस्येवर विजय मिळविता येत नाही. एका बुडबुड्यासारख्या क्षणानंतर सर्व काही ठीक होते. स्वत:च्या आत्मविश्वासावर केंद्रित होऊन कार्य करा. आलेला संकटकाळ निघून जाईल; परंतु सकारात्मक दृष्टिकोण जीवन बदलेल यात शंका ठेवू नका.
-रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा