मोहाडी : रेती तस्करांना सुगीचे दिवस आलेले असून रेतीचे टिप्पर व ट्रॅक्टर शहराच्या आतील रस्त्यावरून दिवसभर अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत जात असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने महसूल व पोलीस अधिकाऱ्यात व रेती तस्करात अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी अवैध रेती व्यवसाय करणारे अधिकाऱ्यांच्या भीती पोटी पहाटेला किंवा रात्री रेतीची वाहतूक करायचे. शहरात दोन चार रेतीचे ट्रॅक्टर धावताना दिसायचे. परंतु आता रेती चोरांच्या मनातील भीती नाहीशी झाली की काय, असे वाटू लागले असून दिवसा ११ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत रेतीचे ४ ते ५ टिप्पर तहसील कार्यालयाला लागून असलेल्या बसस्टॉप चौकातून आंधळगाव कडे व २० ते २५ ट्रॅक्टर कुशारी फाटा ते इंदिरा गांधी चौकातून तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या समोरून शहरात व आंधळगाव कडे बिनबोभाटपणे जात असल्याने व कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. रेती चोर आणि महसूल कर्मचारी, अधिकारी यांच्यात सेटिंग झाल्याची जोरदार चर्चा आहे. प्रति टिप्पर दोन हजार रुपये, तर प्रति ट्रॅक्टर प्रति ट्रिप ५०० रुपये प्रमाणे बोलणी झाल्याची विश्वसनीय माहिती असून, २५ ट्रॅक्टरचे प्रति दिवस १२ हजार ५०० व टिप्परचे दहा हजार असे आठवड्यातून एक दिवस एक लक्ष ५७ हजार रुपये गोळा करून या अधिकाऱ्यांना दिले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळेच इतक्या प्रमाणात रेती वाहतूक होत असताना सुद्धा दोन्ही विभागाकडून कारवाई केली जात नाही. मात्र दिवस भर इतक्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या या वाहनांमुळे मोहाडी शहराच्या आतील रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. ज्यांचे घर रस्त्यावर आहे, त्यांच्या रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना व परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेती व्यावसायिकांकडून मिळणारे हफ्ते बंद करून दिवसा ढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी रेतीची अवैध वाहतूक त्वरित बंद करून लहान बालकांना भयमुक्त व शांतीने जगण्याची मुभा द्यावी, अशी मागणी ज्यांचे घर या रस्त्याला लागून आहे अशा अनेक नागरिकांनी केली आहे.