लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लघु व उच्च दाबाचे वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांकडून वीज चोरी करण्याचे प्रकार प्रामुख्याने महावितरणच्या भरारी पथकांच्या तपासणीत समोर आले आहेत. आकडा टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे, घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक वापर करणे, मीटरला बायपास करून परस्पर वीज कनेक्शन घेणे, अशा प्रकारे वीज चोरी केली जाते. या वीज चोरांचा महावितरणच्या भरारी पथकांकडून शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत.
३५२ वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणच्या भरारी पथकांकडून वर्षभर कारवाया झाल्या. जिल्हाभरातून वीज चोरी करणाऱ्या ३५२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सर्वाधिक चोऱ्या मीटरमध्ये छेडछाडीतून ग्रामीण भागात तारेवर आकडा टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. त्याउलट, शहराच्या परिसरामध्ये मीटरवर लोहचुंबक ठेवून मीटरची गती कमी करणे, मीटर काढून त्यात फेरफार करणे, अशा पद्धतीने मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केली जाते.
महावितरणला लावला ५७.९४ लाखांचा चुना महावितरणच्या भरारी पथकाने जिल्ह्यातील ३५२ वीज चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५७.९४ लाख रुपयांची वीज चोरी करून महावितरणला चुना लावला आहे.
६.३० लाखांची थकबाकी ग्राहकांना वीज चोरी केल्याप्रकरणी वीज कायदा २००३ च्या कलम १२६ व १३५ अन्वये बिल व दंडाच्या रकमेपैकी ६.३० लाखांची थकबाकी वसुली बाकी आहे.
५१ लाख रुपयांची झाली वसुली जिल्ह्यात उच्च व लघु दाबाच्या वीज प्रवाहातून ३५२ ग्राहकांनी वीज चोरी केली होती. त्यापैकी वीज बिल व दंड मिळून ५१.६४ लाख रुपये वसूल करण्यात आले.
पथके नियमित कार्यरत"जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी अधीक्षक अभियंता कार्यालयांतर्गत येणाऱ्या दोन विभागांमध्ये भरारी पथके नियमित कार्यरत आहेत. या भरारी पथकांच्या माध्यमातून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. थकबाकीदार तसेच वीज चोरीत अडकलेल्या ग्राहकांनी दंड व बिल तातडीने भरावे आणि कारवाई टाळावी." - राजेंद्र गिरी, अधीक्षक अभियंता, महावितरण, भंडारा.