भंडारा : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरांची पडझड झाली. पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. मागील २४ तासात भंडारा जिल्ह्यात ७४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोसेखुर्दचे ३३ दरवाजे दीड मीटरने उघडलेपवनी : वैनगंगा नदीमध्ये संजय सरोवरातील पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली. वैनगंगा व मरू नदीला पूर असल्याने पाऊणगाव पाण्याने वेढलेला आहे. तसेच निलज नागपूर रोडवरील मरू नदीच्या पुलाचे दोन्ही बाजूला पाणी असल्याने दुपारपासून नागपूरची रहदारी बंद आहे. गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी २४०.६०० मिटर असून १४.६३६ टीएमसी एवढा पाणी धरणात आहे. त्यामुळे पुनर्वसन होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गावात धरणाचे पाणी शिरू नये यासाठी धरणाचे ३३ दरवाजे दुपारी ३ वाजता दीड मिटर उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात ९,२२९ क्युमेक्स म्हणजे २,७२,९५० क्युसेस पाण्याची विसर्ग सुरु आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तालुक्यातील कोदुर्ली, गुडेगाव, सावरला गावाजवळच्या नाल्याला थोप आलेली आहे. परिणामी नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पवनीच्या जंगलव्याप्त क्षेत्रात पाऊणगाव असून तो मरु नदीच्या काठावर आहे तसेच धरणामध्ये पाणी वाढल्याने पाऊणगाव लगत पाणी पोहचलेला आहे. भंडाऱ्यात पालिकेची पोलखोलभंडारा : शहरातील खात रोड मार्गावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरालगत असलेल्या भोजापूर येथे काही घरांच्या सभोवताल पाण्याने वेडा घातला आहे. मागील दोन दशकांपासून या परिसरात समस्या असूनही स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अतिवृष्टीमुळे नगरपालिका प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहे. नाल्यात कचरा तुंबला असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत होते. खात रोड आणि सिव्हील लाईन परिसरात नालीतील पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. लाखांदुरात १८ घरे पडलीलाखांदूर : तालुक्यात यंदा कधी नव्हे इतका ८६.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीने तालुक्यातील १८ घरांचे अंशत: नुकसान झाले. तालुक्यातील चौरास भागाीतल धानपीक पाण्याखाली आले. मागील पाच वर्षाची आॅगस्ट महिन्यापर्यंतची पावसाची सरासरी बघता यंदा निम्म्यावर असूनही कालच्या पावसाने चांगलाच कहर केला. ८६.९ मी.मी. पाऊस, नदी, नाले, ओढे भरभरून वाहण्यासाठी कारणीभूत ठरला. ओपारा गावाशी नाल्यावर पाच फुट पाणी चढल्याने संपर्क तुटला. सन २०११ ला आॅगस्ट महिन्यात पावसाची सरासरी १४१७ मीमी, २०१२ ला १५९५ मीमी, २०१३ ला सर्वाधिक म्हणजे २१८३ मीमी, २०१४ ला ७७५ मिमी तर यंदा आॅगस्ट महिन्याचा सुरवातीपर्यंत केवळ ६२८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीचा फटका विद्युत तारा, खंबे, झाडे व कच्च्या घरांना मोठ्या प्रमाणात बसला. २० घरात शिरले पाणी जवाहरनगर : जवाहरनगर परिसरात दमदार पावसाने झोडपून काढले. २० घरात पाणी शिरले. पिके पाण्याखाली, शेतीचे अवजारे वाहून गेले. आयुध निर्माणी कारखान्यालगत कन्हान नदी दुथडी वाहून जात आहे. परसोडी येथील दिगांबर कोरे, अशोक मेश्राम, मोरेश्वर बावनकुळे, संगीता मेश्राम यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बावणकुळे यांच्या शेतामधील पी.व्ही.सी. पाईप नाल्यात वाहून गेले. ठाणा पेट्रोलपंप येथील रस्त्यालगतच्या घरात व दुकानात पाणी शिरले. यात अयुब शेख, फरजाना शेख, गणेश चौधरी, गंगुबाई कुर्वे, सुनिता निनावे, कांता वासनिक, राजेदहेगाव येथील दामोधर इटनकार, देवदत्त लेंडे यांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड, अन्न धान्य, तेल, कपडे, शैक्षणिक साहित्य भांडी पाण्यावर तरंगत होते. देवेंद्र रंगारी यांच्या दुकान, खराबे कृषी केंद्र, जय गुरुदेव कापड केंद्र या दुकानात तीन फूट पाणी शिरले होते. शहापुरात रस्त्यावर पाणीशहापूर : येथील रस्त्यालगत बँक मध्ये, विद्युत कार्यालयात पाणी शिरले. रस्त्यावर तीन फुट पाणी साचलेला होता. एमआयईटीचा रस्ता पाण्याखाली गेला. रस्त्याच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कंत्राटदाराने करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम व दर्शन भोंदे यांनी केले तहसीलदार, मंडल अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत.मरू नदीला पूरभुयार : जोरदार पावसाने नागपूर नागभिड मार्गावरील निलज जवळील मरु नदीला पूर आल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली असून दुपारी दीड वाजतापासून वाहतूक ठप्प होती. पुरामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून प्रवाशांना उभे राहून वाट पाहण्याशिवाय पर्याय नही. पूर इतका जोरात आहे की अजून चार तास पूर ओसरण्याची शक्यता नव्हती. तेथील परिसर जलमय झाला होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पवनीचे पोलीस निरीक्षक मधुकर गीते ताफ्यासह घटनास्थळी होते.शेतकरी आनंदलामासळ : १५ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मासळ व परिसरात मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पंधरा दिवसापूर्वी साधारण पाऊस पडला होता. त्यामुळे धानाची रोवणी सुरु झाली होती. त्यानंतर पाऊस लांबल्याने रोवणी खोळंबली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी इंजिनच्या सहाय्याने मिळेल त्या ठिकाणचा पाणी काढून रोवणी सुरु ठेवली होती. आजच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. मोहदुरा येथे पुराचे सावटमोहदुरा : दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पाण्याने मोहदुरा येथील लहान पुलावर तीन ते चार फुट पाणी ओसंडून वाहत असून पुराचे सावट आहे. येथील नाल्यावर असलेल्या पुरामुळे मोहदुरा खुर्शीपार मार्ग पूर्णत: बंद असून विद्यार्थी, शिक्षक तथा इतर कर्मचारी यांना मोहदुरा येथे येण्यासाठी सातोना येथून फेऱ्याने यावे लागत असून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच दिवसापासून पुलाची मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुरात दुचाकी वाहून गेलीमोहाडी : १२ आॅगस्टला सायंकाळी व आज सकाळी तीन तास मुसळधार पाऊस आल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चौंडेश्वरी पुलावरून दोन तीन फुट पाणी वाहत असताना मनोज तलमले (३०) हा तरुण दुचाकीसह पाण्यात पडला. सुदैवाने जीव वाचविण्यात यशस्वी ठरला. मोहाडी तालुक्यात या पावसाळ्याचा पहिला जोरदार पाऊस १२ आॅगस्टला आला. नदी नाल्याचा पहिला पूर बघण्याचा आनंद गावकऱ्यांना मिळाला. दहेगाव रोहणा पुलावर दोन तीन फुट पाणी आहे. मोहाडी कान्हळगाव, मोहाडी मांडेसर पुलावरून दोन तीन फुट पाणी वाहत असल्याने मोरगाव, कान्हळगाव, सिरसोली, चिचखेडा, हरदोली, मांडेसर, रोहणा, बेटाळासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोहाडीतील तिन्ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दुपारीच सुटी देण्यात आली. दमदार पावसामुळे खोळंबलेली रोवणी आज धडाक्यात सुरु झाली. एकाचवेळी रोवणी सुरु झाल्याने मजुरी वाढली आहे. रोवणी करणाऱ्या महिला मजुरासाठी शेतकरी घरोघरी फिरताना आढळून आले.
मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित
By admin | Updated: August 13, 2015 23:59 IST