धो-धो बरसला पाऊस;25 मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 05:00 AM2022-07-14T05:00:00+5:302022-07-14T05:00:06+5:30

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात गत २४ तासात सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १४८ मिमी, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भंडारा तालुक्यात १६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने सर्वाधिक हाहाकार तुमसर तालुक्यात उडाला आहे. सिहोरा परिसरातील अनेक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

Heavy rain showers; | धो-धो बरसला पाऊस;25 मंडळात अतिवृष्टी

धो-धो बरसला पाऊस;25 मंडळात अतिवृष्टी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी रात्री धो-धो पाऊस बरसल्याने २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे. भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग आणि भंडारा-तुमसर राज्यमार्ग ठप्प झाला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात तब्बल ९५.८ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस कोसळला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात गत २४ तासात सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १४८ मिमी, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भंडारा तालुक्यात १६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने सर्वाधिक हाहाकार तुमसर तालुक्यात उडाला आहे. सिहोरा परिसरातील अनेक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तुमसर येथील स्टेशनटोली शिवारात ईदगाहला पाण्याचा वेढा पडला आहे. परसवाडा-देव्हाडा येथील सीताबाई प्रल्हाद खवास यांचे घर या पावसात कोसळले. यामुळे त्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. 
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात दमदार पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. आंधळगाव येथील आठवडी बाजारात गायमुख नदीचे पाणी शिरल्याने आठवडी बाजार कुठे भरवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
तुमसर शहरात ढगफुटीसदृश पाऊस कोळला. पिपरा रस्त्यावर पाणीपातळी वाढली. पवनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस कोसळला होता. त्यानंतरच्या पावसाने काही प्रमाणात तूट भरून काढली. मात्र मंगळवारी रात्री बरसलेल्या एकाच पावसाने तूट भरुन काढली आहे. जिल्ह्यात सध्या सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते १३ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ४२६.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी
- जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि भारतीय हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट तसेच धापेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बुधवारी तातडीने बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात १३० गावे नदीतिरावर असून या सर्व गावांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदारांनी द्याव्या असे त्यांनी सांगितले. आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी प्रवास टाळावा, पुलावरुन पाणी वाहत असताना वाहने नेऊ नये. तसेच आपत्ती संदर्भातील कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. अशी कोणतीही माहिती असल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मंडळात झाली अतिवृष्टी
- जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखांदूर या पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील २५ मंडळात अतिवृष्टी झाली असून त्यात भंडारा तालुक्यातील धारगाव, पहेला, मोहाडी तालुक्यातील मोहाडी, वरठी, करडी, कांद्री, कन्हाळगाव, आंधळगाव, तुमसर तालुक्यातील तुमसर, नाकाडोंगरी, सिहोरा, मिटेवानी, गर्रा, पवनी तालुक्यातील पवनी, अड्याळ, कोंढा, चिचाळ, आसगाव, आमगाव, साकोली तालुक्यातील साकोली, सानगडी, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, मासळ, लाखनी तालुक्यातील पालांदूर (चौ.) या मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने रोवणी झालेल्या बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामुळे धानपीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

एसटी बस सेवा विस्कळीत
- नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे भंडारा विभागातील अनेक रस्त्यावरील बससेवा बुधवारी ठप्प झाली होती. पवनी-लाखांदूर मार्गावरील मांगली-बोरगाव येथील नाल्याच्या पुलावरुन पाणी असल्याने हा रस्ता बंद झाला आहे. वांगी ते खोबा मार्गावरील पुलावर पाणी असल्याने बसेस परत बोलावण्यात आल्या आहेत. तुमसर ते खमारी, पांढराबोडी, ताडगाव आणि तुमसर ते पवनी या बसेसही बंद झाल्या आहेत. तुमसर-भंडारा मार्गावर मोहाडी येथे पाणी जास्त वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एसटीची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुलाच्या ठिकाणी बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. तसेच पोलिसांची या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. 

 

Web Title: Heavy rain showers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.