लॉटरी कुणाला? : ५३ उमेदवारांच्या भाग्याचा निकाल आजभंडारा : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक बुधवारला आटोपली. त्यादिवसापासून प्रत्येकांच्या तोंडात एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडून कोण येणार. मतमोजणीचा दिवस जवळ आला असून तिन्ही विधानसभा क्षेत्रातील ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, ते दुपारी १२ वाजतापर्यंत कळेलच.भंडारा जिल्ह्यात ५३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. तुमसर क्षेत्रात काँग्रेसकडून प्रमोद तितीरमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर कुकडे, भाजपकडून चरण वाघमारे, शिवसेनेकडून राजेंद्र पटले, बसपाकडून नामदेव ठाकरे यांच्यासह १३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे भाजप, राकाँ, सेना अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे काँग्रेस, बसपा किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, याची उत्सुकता प्रत्येकांना लागली आहे.भंडारा क्षेत्रात काँग्रेसकडून युवराज वासनिक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सच्चिदानंद फुलेकर, भाजपकडून अॅड.रामचंद्र अवसरे, शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर, बसपाकडून देवांगना गाढवे यांच्यासह १९ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे भाजपा, बसपा, सेना अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे काँग्रेस, राकाँ किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, हे पाहणे मजेचे ठरणार आहे.साकोली क्षेत्रात काँग्रेसकडून सेवक वाघाये, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिल फुंडे, भाजपकडून राजेश काशीवार, शिवसेनेकडून डॉ.प्रशांत पडोळे, बसपाकडून डॉ.महेंद्र गणवीर यांच्यासह २१ उमेदवारांनी निवडणूक लढविली. येथे काँग्रेस, राकाँ, भाजपा अशी त्रिकोणी लढत झाली. त्यामुळे सेना, बसपा किती मते घेतात आणि कुणाच्या मतांचे गणित बिघडवितात, हे उद्या रविवारला दुपारपर्यंत कळेलच. (जिल्हा प्रतिनिधी)
उत्कंठा शिगेला!
By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST