कोंढा-कोसरा : कृषी पंपासाठी वीज जोडणीचा मुद्दा कोंढा परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवन-मरणाचा बनत चालला आहे. दोन वर्षापासून डिमांड भरुन वीज वितरण कार्यालय वीज जोडणी करुन देत नाही. यामुळे परिसरातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून उन्हाळी धान पिकाची लागवड करु शकले नाही. पर्यायाने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.कोंढा व कोसरा येथील कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी वीज जोडणीसाठी डिमांड भरले आहे. आधी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात बोअरवेल खोदली. शेताला पाणी देण्यासाठी विद्युत जोडणी हवी असल्याने अर्ज केले. पण त्यांना जोडणी करुन मिळाली नाही. ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे वीज जोडणीसाठी प्रतिक्षा यादी कार्यालयाने तयार केली. पण त्यामध्येदेखील घुसखोरी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतात कृषी पंपाचे वीज जोडणीसाठी विद्युत खांब व तारा घालताना शेतकऱ्यांकडून हजारो रुपये वसूल करतात. ठेकेदाराच्या लेदे नामक सुपरवायजरने शेतकऱ्यांना बनवून हजारो रुपये वसूल केले. मात्र अद्यापही जोडणी झाली नाही. या संबंधात सहायक अभियंता नायडू यांना विचारले तर ते याबद्दल उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेतात. पण गंभीरतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.कर्ज काढून बोअरवेल केले पण सिंचनाची सुविधा न झाल्याने शेतकऱ्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. प्रभाकर मेश्राम रा. सोमनाळा या शेतकऱ्यांने कर्ज काढून बोअरवेल खोदली मात्र, वीज जोडणीसाठी कार्यालयाच्या चकरा मराव्या लागत असल्याची खंत त्यांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. तेव्हा महावितरण विभागाने शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी त्वरीत करून द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांवर वाढतोय कर्जाचा डोंंगर
By admin | Updated: May 23, 2015 01:12 IST