पावसाळ्यात ८० टक्केच पाऊस : ४३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईचे संकेतलोकमत विशेषइंद्रपाल कटकवार भंडाराभूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी सरासरीच्या सुमारे दोन मीटरने घटली असल्याचे दिसून आले आहे. सरासरीपेक्षा पावसाची कमी हजेरी तसेच पाण्याचा सतत होणारा उपसा, त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलने महत्वाच आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास केवळ ८० टक्के पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे आलेला पाणी नदी, नाल्याव्दारे वाहून गेला. मात्र भूगर्भात कमी प्रमाणात पाणी झिरपले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गासह नागरिकांनी विंधन विहीर, विहीर आदींच्या माध्यमातून भूगभार्तील पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली. इंजीन लावून नाले, बोड्या पूर्णपणे आटविण्याचा प्रकारही करण्यात आला. मान्सुन काळात झळ न बरसल्याने भूजलात पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी यानंतरही भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने तीन महिन्यातून एकदा भूजलाचे सर्वेक्षण करून भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजल पातळी तपासण्यासाठी जिल्हाभरातील ७४ विहिरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० विहिरींच्या भूजल पातळीत घट तर ४४ विहिरींच्या भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी २.०२ मिटरने घटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सप्टेंबर २०१५ मध्ये भूजल पातळी सरासरी १.५७ मीटर इतकी आहे.मागील पाच वर्षात सरासरी भूजल पातळी २.०२ तर यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळी मात्र १.५७ असल्याने यात ०.४६ टक्के घट झाल्याचे आढळते. कमी पावसामुळे जलसिंचनासाठी पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्यावतीने जलसंधारणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासनाचे शेकडो कोटी रुपए खर्च करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही भूजलाची पातळी वाढण्याऐवजी दरवर्षी घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलसंधारणाचे शेकडो कोटी रुपए जातात कुठे, असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या कमी आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानही चांगले आहे. त्यामुळे भूजलाची पातळी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक असली तरी घटत चाललेली भूजल पातळी चिंता वाढविणारी आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही, याकरिता संबंधित यंत्रणा कामात लागली आहे. पाऊस कमी व पाण्याचा सतत उपसा यामुळे भूजल पातळीत घट होण्याची प्रमुख करणे सर्वेक्षणात आढळून आली. पाण्याचा वापर जपून करणे महत्वाचे आहे.- पी. आर. साल्पेकर,भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण भंडारा.
दोन मीटरने घटली भूजल पातळी
By admin | Updated: November 7, 2015 00:23 IST