पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : करडी पोलीस स्टेशनचे उद्घाटनकरडी (पालोरा) : संकटाचे वेळी न्यायासाठी आपुलकीच्या भावनेने पोलिसांकडे पाहिले जाते. लोकांच्या न्यायाची अपेक्षा पोलिसांकडून असते. मात्र विश्वास कमी झाल्यास असंतोषाची भावना वाढीस लागते. त्यामुळे पोलिसांनी जबाबदारीने वागले पाहिजे. परंतु त्याचवेळी नागरिकांना पोलिसांचा दरारायुक्त आदर वाटला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राखली जाण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक सावंत यांनी केले. करडी येथील पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. प्रमुख अतिथीस्थानी आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जि.प. सदस्या निलीमा इलमे, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे, महेंद्र शेंडे, सरपंच सीमा साठवणे प्रामुख्याने हजर होते.खा.नाना पटोले म्हणाले, मोहाडी तालुक्याचे अंतर मोठे असल्याने करडी तालुका झाला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाचे निधीतून तालुक्याचे दोन्ही भाग जोडणारा मुंढरी ते रोहा वैनगंगा नदीवरील पुल बांधण्याा निर्णय झालेला असून अंदाज पत्रके तयार झाली आहेत. पोलिसांची वाटणारी भीती व गैरवापर टाळण्यासाठी पोलीस मित्रांची भूमिका समन्वयाची राहील. सामान्य नागरिक व पोलिसांतील दरी कमी होण्यास त्यामुळे मदत होईल. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होऊन भरीव मदत होण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठविण्याचे सुतोवाचही पालकमंत्री व आमदारांकडून पाहून पटोले यांनी केले. करडी पोलीस स्टेशनसाठी सहा अधिकारी व ४६ पोलीस कर्मचारी स्टॉफ मंजूर आहे. इमारत बांधकाम व अन्य सुविधांसाठी १ कोटी १३ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास निधी पुरविण्याची मागणी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी प्रास्ताविकातून केली. संचालन भास्कर गाढवे यांनी केले तर आभार ठाणेदार आर.के. बोरकुटे यांनी मानले. उपविभागीय पोलीस अधिकारी एम.एफ. शेंडे, प्रकाश बुराडे, विजया सावरकर, गृह पोलीस अधीक्षक धरमसी, राठोड, इंजि. पी.एन. माथूरकर, जयवंत चव्हाण, गुंजवटे, ए.टी. लोळे, कटरे, चौधरी, आसाराम नंदेश्वर, गौरीशंकर गौतम, पोलीस मित्र, पोलीस पाटील व करडी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
दरारायुक्त आदर वाढला पाहिजे
By admin | Updated: November 8, 2015 00:41 IST